खेळाडूंना सातत्याने संधी दे!

Mumbai
गांगुलीची कर्णधार कोहलीला सूचना

विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये बरेच यश मिळाले आहे. मात्र, कसोटी संघात सतत बदल करत राहण्यामुळे त्याच्यावर आणि प्रशिक्षक रवी शास्त्रींवर टीकाही झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला संघात स्थान मिळाले नाही.

संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयाचे सुनील गावस्कर यांना आश्चर्य वाटले होते. गावस्कर यांच्याप्रमाणेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीलाही अश्विनला संघातून वगळल्याचे आश्चर्य वाटले. खेळाडूंनी उत्तम कामगिरी करण्यासाठी कोहलीने त्यांना सातत्याने संधी दिली पाहिजे, असे गांगुलीला वाटते.

विराटने खेळाडूंवर विश्वास दाखवून, त्यांना सातत्याने संधी दिली पाहिजे. तसे झाल्यास खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो. श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत किती उत्कृष्ट पद्धतीने खेळला हे आपण सर्वांनीच पहिले. तुम्ही त्याची संघात निवड केली आहे, तर त्याला प्रत्येक सामन्यात खेळवून, नैसर्गिक खेळ करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. श्रेयसप्रमाणेच इतर बर्‍याच खेळाडूंना विराट प्रोत्साहन देईल, अशी मला खात्री आहे.