९४ मीटर भालाफेक आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णचे लक्ष्य !

नीरज चोप्राचे प्रशिक्षक उवे हॉन

Mumbai
Neeraj Chopra

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने मागील वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने राष्ट्रकुल स्पर्धा आणि एशियाड या दोन स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत ८६.४७ मीटर लांब भालाफेक केला होता. त्यानंतर दोहा येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये त्याने ८७.४३ मीटर लांब भालाफेक केला. एशियाडमध्ये आपल्या कामगिरीत अधिकच सुधारणा करत त्याने ८८.०६ मीटरचे अंतर गाठले. त्यामुळे त्याला पुढील वर्षी होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे दावेदार मानले जात आहे. मात्र, याबाबत त्याला फारशी चर्चा करायची नाही. नीरजला चर्चा करायची नसली तरी त्याचे प्रशिक्षक उवे हॉन यांनी मात्र नीरजचे काय लक्ष्य आहे हे सांगितले.

आमचे यावर्षीची पूर्णपणे फिट रहायचे आणि ९२ मीटर भालाफेक करत दोहा येथे होणार्‍या जागतिक चॅम्पियनशिपच्या अव्वल सहामध्ये येण्याचे आमचे ध्येय आहे. त्यानंतर २०२० मध्ये ९४ मीटर लांब भालाफेक करायचे आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे हॉन यांनी सांगितले. माजी भालाफेकपटू असणारे हॉन हे एकमेव असे खेळाडू आहेत ज्यांनी १०० मीटरचा टप्पा पार केला आहे. त्यांनी १९८४ मध्ये इस्ट जर्मनीकडून १०४.८ मीटर लांब भालाफेक केला होता.

भारताला ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये कधीही पदक मिळवता आलेले नाही. नीरज चोप्रा हा आयएएएफच्या जागतिक क्रमवारीत सध्या चौथ्या स्थानी आहे आणि त्यामुळे टोकियोमध्ये तो भारताला पदक मिळवून देऊ शकतो असे म्हटले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here