घरक्रीडाग्रॅहम रीड भारतीय हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक

ग्रॅहम रीड भारतीय हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक

Subscribe

मागील चार महिने प्रशिक्षकाविनाच असणार्‍या भारतीय हॉकी संघाला सोमवारी नवे प्रशिक्षक मिळाले. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांची भारतीय हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. सध्या भारताचे बंगळुरू येथे राष्ट्रीय शिबिर सुरू आहे. रीड लवकरच तिथे जाऊन संघाला भेटतील, अशी माहिती देण्यात आली आहे. रीड यांना पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत हे पद देण्यात आले असून, या काळात भारताने चांगले प्रदर्शन केले, तर त्यांचा करार २०२२ विश्वचषकापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

रीड नुकतेच हॉलंड संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करत होते. या संघाने मागील वर्षी भारतात झालेल्या विश्वचषकात रौप्यपदक मिळवले होते. या विश्वचषकात भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर जानेवारीमध्ये हरेंदर सिंग यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.

- Advertisement -

ग्रॅहम रीड हे प्रशिक्षक होण्याआधी खूप चांगले खेळाडू म्हणून ओळखले जायचे. १९९२ च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियन संघाचा ते भाग होते. तसेच ते संघात असताना ऑस्ट्रेलियाने १९८४, १९८५, १९८९ आणि १९९० ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. ऑस्ट्रेलियाकडून १३० सामने खेळणार्‍या रीड यांची २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाली होती. त्यानंतर त्यांची मुख्य प्रशिक्षक म्हणूनही निवड झाली. ते मुख्य प्रशिक्षक असताना ऑस्ट्रेलियाने २०१२ ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती.

भारताचे प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल रीड म्हणाले, भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून निवड होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या खेळात भारतीय संघाच्या इतिहासाशी तुलना करू शकू असा दुसरा देश नाही. प्रतिस्पर्धी संघाचा प्रशिक्षक असताना मला भारताची प्रगती पाहून खूप बरे वाटायचे. मला वेगाने आणि आक्रमकपणे खेळायला आवडते, जसे भारतीय संघ आता खेळतो. त्यांची खेळण्याची पद्धत ऑस्ट्रेलियासारखीच आहे. मी हॉकी इंडिया, साई, खेळ मंत्रालय, इतर प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -