हिमाची पुन्हा सुवर्ण कमाई!

Mumbai
Hima Das

भारताची आघाडीची धावपटू हिमा दासने चेक प्रजासत्ताक येथे झालेल्या मेटूजी ग्रँड प्रिक्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. हे तिचे एकाच महिन्यातील पाचवे सुवर्णपदक होते. हिमाने या स्पर्धेतील ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ५२.०९ सेकंड वेळ नोंदवून सुवर्णपदक आपल्या नावे केले. हिमाची ४०० मीटर शर्यतीतील ही यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम वेळ होती. मात्र, तिला स्वतःची सर्वोत्तम वेळ मोडण्यात यश आले नाही. तिने जकार्ता येथे झालेल्या एशियाडमध्ये ५०.७९ अशी वेळ नोंदवली होती. तसेच ५१.८० सेकंदापेक्षा जास्त वेळ लागल्याने ती जागतिक चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरली नाही.

याआधी या महिन्यात हिमाने २ जुलैला पोलंडमध्ये झालेल्या पोझनान अ‍ॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत, ७ जुलैला कुंटो अ‍ॅथलेटिक्स मीटमध्ये, १३ जुलैला चेक प्रजासत्ताकमध्ये आणि १७ जुलैला टॅबोर अ‍ॅथलेटिक्स मीट या स्पर्धांमध्ये सुवर्ण पटकावले आहे. चेक प्रजासत्ताक येथे झालेल्या मेटूजी ग्रँड प्रिक्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. व्ही. के. विस्मयाने ५२.४८ सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्यपद पटकावले, तर सरिताबेन गायकवाडने ५३.४८ सेकंदासह कांस्यपदक मिळवले. भारताच्याच एम. आर. पूवाम्माने ५३.७४ सेकंदासह चौथा क्रमांक मिळवला.

पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीत मोहम्मद अनसने रौप्यपदक, तर पुरुषांच्या ४०० मीटरच्या शर्यतीत भारताच्याच नोह निर्मल टॉमने ४६.०५ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले. पुरुषांच्या ४०० मीटरच्या अडथळा शर्यतीत भारताच्या एम. पी. जबीरने ४९.६६ सेकंदांसह सुवर्णपदक पटकावले.