हिमा दासची सोनेरी घोडदौड; पटकावले पाचवे सुवर्णपदक

धावपटू हिमा दासने शनिवारी झालेल्या स्पर्धेत झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत बाजी मारत सुवर्णपदक पटकावले.

Prag
hima das
हिमा दास

भारताची धावपटू हिमा दासने महिन्याभरात पाचवे सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे देशभरात तिचे कौतुक केले जात आहे. तिची यशाची घोडदौड सुरुच आहे. शनिवारी तिने झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत बाजी मारत सुवर्णपदक पटकावले. यासंदर्भाच हिमाने स्वत: आपल्या ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे. झेक प्रजासत्ताक येथील ४०० मीटर शर्यंत पूर्ण केल्याचे हिमा दास म्हणाली. हिमाने ही शर्यत ५२.०९ सेकंदात पूर्ण केली.

हिमाची याअगोदरील कामगिरी

हिमाने याअगोदरही सुवर्णपदके जिंकली आहेत. विशेष म्हणजे तिने या महिन्यातच चार सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यानंतर शनिवारी झालेल्या शर्यतीत जिंकून तिने आपल्या नावावर पाचवे सुवर्णपदक कोरले आहे. २ जुलैला हिमाने पोजनान अॅथलेटिक्स येथील ग्रां.प्री. स्पर्धेत सहभागी होऊन २०० मीटरची शर्यत २३.६५ सेकंदात पूर्ण करुन सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर ७ जुलैला कुटनो अॅथलेटिक्स येथील मीट स्पर्धेत देखील २०० मीटरची शर्यंत तिने पार करत सुवर्णपदक जिंकले. १३ जुलैला झेक प्रजात्ताक येथील क्लांदो अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. १८ जुलैला झेक प्रजासत्ताक येथीलच टबोर अॅथलेटिक्स मीट स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले. या चार सुवर्णपदकानंतर शनिवारी ४०० मीटरच्या झालेल्या शर्यतीतही तिने विजय मिळवत सुवर्णपदाकावर आपले नाव कोरले.


हेही वाचा – माझे यश कळायला आईवडिलांना वेळ लागला – हिमा दास