घरक्रीडादिग्गज हॉकीपटू बलबीरसिंग सीनिअर यांचे निधन!

दिग्गज हॉकीपटू बलबीरसिंग सीनिअर यांचे निधन!

Subscribe

बलबीरसिंग सीनिअर ताप आल्यामुळं यांना ८ मेरोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक  विजेते दिगग्ज हॉकीपटू बलबीरसिंग सीनिअर यांचे निधन झाले आहे. आज सकाळी ६ वाजून १७ मिनीटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या एक महिन्यापासून त्यांना फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

- Advertisement -

बलबीरसिंग सीनिअर ताप आल्यामुळं यांना ८ मेरोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १८ मेपासून त्यांची प्रकृती बिकट होती. मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयाचे अभिजीत सिंग यांनी बलबीरसिंग यांच्या मृत्यूची बातमी दिली.

कोण होते बलबीरसिंग

बलबीरसिंग सीनिअर यांनी लंडन (१९४८), हेलसिंकी (१९५३) आणि मेलबर्न (१९५६) या  ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला तीन सुवर्णपदक मिळवून दिलं. बलबीरसिंग यांचा एक विक्रम अद्यापही कायम आहे. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये नेदरलँड्सविरुद्ध 6-1ने जिंकलेल्या सामन्यात बलबीरसिंग यांनी पाच गोल केले होते. ते 1975 च्या वर्ल्डकप जिंकणार्‍या भारतीय हॉकी संघाचे व्यवस्थापकही होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने निवडलेल्या आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील 16 महान ऑलिम्पियन खेळाडूंमध्ये बलबीर यांचा समावेश होता.

- Advertisement -

पद्मश्री पुरस्कार मिळवणारे पहिले क्रीडापटू

बलबीर सिंग सीनियर यांना १९५७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच क्रीडापटू होते. नवी दिल्लीमध्ये झालेल्या १९८२ एशियाड स्पर्धेत क्रीडाज्योत पेटवण्याचा मानही सिंग यांना मिळाला होता. २०१५ मध्ये सिंग यांना हॉकी इंडियाने ध्यान चंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. १९७७ मध्ये त्यांनी ’द गोल्डन हॅट्ट्रिक : माय हॉकी डेज’ नामक आत्मचरित्र लिहिले.

राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी वाहिली आदरांजली

बलबीर सिंग सीनियर यांना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारे, पद्मश्री पुरस्कारप्राप्त आणि भारताच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असणारे दिग्गज हॉकीपटू बलबीर सिंग सीनियर यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटले. त्यांची कामगिरी भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले. तर पंतप्रधान मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, पद्मश्री बलबीर सिंग सीनियर हे कायमच त्यांच्या खेळासाठी स्मरणात राहतील. त्यांची कामगिरी भारतासाठी गौरवास्पद आणि अभिमानास्पद ठरली. ते फारच उत्कृष्ट खेळाडू होते आणि प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी छाप पाडली. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर फार दुःख झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -