घरक्रीडायंदा आयपीएल होण्याची आशा, त्यानंतर पुनरागमनाचा निर्णय - डिव्हिलियर्स

यंदा आयपीएल होण्याची आशा, त्यानंतर पुनरागमनाचा निर्णय – डिव्हिलियर्स

Subscribe

पुढील काही सामन्यांत मी कशी कामगिरी करतो यावर माझा निर्णय अवलंबून असेल. यंदा आयपीएल होईल अशी मला आशा आहे. त्यानंतरच मी पुनरागमनाचा निर्णय घेऊ शकेन, असे डिव्हिलियर्स म्हणाला.

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स हा जागतिक क्रिकेटमधील चाहत्यांना सर्वात आवडणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. डिव्हिलियर्सने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. परंतु, तो त्यानंतरही जगभरातील विविध टी-२० स्पर्धांत खेळत होता. त्यामुळे डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकेल असे म्हटले जाऊ लागले. परंतु, त्याने याला नकार दिला. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीकाही झाली. मात्र, मार्क बाऊचर दक्षिण आफ्रिकेचा प्रशिक्षक झाल्यानंतर त्याने डिव्हिलियर्सशी पुनरागमन करण्याबाबत संवाद साधला. परंतु, तो याबाबतचा अजून कोणताही निर्णय घेऊ शकलेला नाही.

माझ्यावर टीकाही झाली

मागील पाच वर्षांत बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. मी निवृत्ती स्वीकारली, तेव्हा बुद्धी एक गोष्ट सांगत होती आणि मन वेगळेच सांगत होते. मी काही मालिका खेळत होतो आणि काहींमध्ये विश्रांती घेत होतो. त्यामुळे माझ्यावर टीकाही झाली. मला क्रिकेटपासून काही काळ दूर जायचे होते आणि म्हणूनच मी निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर मी बरेचदा पुनरागमन करण्याबाबत विचार केला. आयपीएल किंवा बिग बॅश लीग या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यावर टी-२० विश्वचषक खेळण्याचा विचार माझ्या मनात यायचा, असे डिव्हिलियर्स म्हणाला.

- Advertisement -

पुढील काही सामन्यांतील कामगिरीवर निर्णय अवलंबून

बाऊचर प्रशिक्षक झाल्यानंतर त्याने मला पुनरागमन करण्याबाबत विचारणा केली. मी त्याला लगेच होकार देऊ शकलो नाही. मी अजूनही फिट आहे. पुढील काही सामन्यांत मी कशी कामगिरी करतो यावर माझा निर्णय अवलंबून असेल. त्यामुळे यंदा आयपीएल होईल अशी मला आशा आहे. त्यानंतरच मी पुनरागमनाचा निर्णय घेऊ शकेन. मी शारीरिकदृष्टया किती फिट आहे, मी खेळण्यास अजूनही उत्सुक आहे का, या सर्व गोष्टींचा मला विचार करावा लागेल, असेही डिव्हिलियर्सने नमूद केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -