अश्विनला वगळलेच कसे?

सुनील गावस्करांचा सवाल

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६५ सामन्यांत ३४२ विकेट्स मिळवल्या आहेत. खासकरून वेस्ट इंडिजविरुद्ध त्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. त्याने विंडीजविरुद्धच्या ११ सामन्यांत ६० बळी मिळवले आहेत. मात्र, असे असतानाही त्याची विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात निवड झाली नाही. या संघात डावखुर्‍या रविंद्र जाडेजाच्या रूपात केवळ एका फिरकीपटूचा समावेश होता. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयाचे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना आश्चर्य वाटले.

ज्या गोलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये इतकी चांगली कामगिरी केली आहे, खासकरून वेस्ट इंडिजविरुद्ध ज्याचे प्रदर्शन फारच उल्लेखनीय आहे, अशा रविचंद्रन अश्विनला तुम्ही संघातून वगळूच कसे शकता? भारताच्या या निर्णयाचे मला फार आश्चर्य वाटत आहे, असे गावस्कर म्हणाले.

विंडीजविरुद्ध अश्विनने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही दमदार कामगिरी केली आहे. त्याला संघातून का वगळले, असे पहिल्या दिवसाच्या खेळानंतर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला विचारले असता त्याने सांगितले, अश्विनसारख्या खेळाडूला संघात न घेणे हा निर्णय फार अवघड आहे. मात्र, संघ व्यवस्थापन प्रत्येक निर्णय विचार करूनच घेते. त्यांच्या मते जाडेजा या सामन्यासाठी सर्वोत्तम पर्याय होता. तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करू शकतो. हनुमा विहारीसुद्धा या खेळपट्टीवर गोलंदाजी करू शकेल.