घरक्रीडासातत्याने सामने न खेळल्याने नुकसान !

सातत्याने सामने न खेळल्याने नुकसान !

Subscribe

सातत्यानं न खेळल्यानं नुकसान झाल्याची कबुली भुवनेश्वर कुमारनं दिली आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला मागील काही काळात दुखापतींनी सतावल्यामुळे सातत्याने सामने खेळता आलेले नाहीत, तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही त्याची भारतीय संघात निवड झाली होती. पण, त्याला एकही सामना खेळायची संधी मिळाली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना हा त्याचा दीड महिन्यांतील पहिला सामना होता. या सामन्यात त्याला चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्याने या सामन्यात 2 विकेट तर घेतल्या. पण, त्या बदल्यात 66 धावा दिल्या. त्यामुळे सातत्याने सामने न खेळल्याने लय सापडायला वेळ लागला, असे त्याने दुसर्‍या सामन्याआधी कबूल केले.

सातत्याने सामने न खेळल्यामुळे मला लय सापडायला वेळ लागतो आहे. मी नेट्समध्ये कसून सराव केला असला तरी प्रत्यक्ष सामन्यात खेळणे हे पूर्णपणे वेगळे असते. मी बर्‍याच दिवसाने सामना खेळत असल्याने मला पहिल्या सामन्यात लय सापडायला वेळ लागला. पहिल्या सामन्यात मी चांगले प्रदर्शन केले नाही. पण, जसे मी अधिकाधिक सामने खेळीन तसे मला माझी लय सापडेल, असे भुवनेश्वर म्हणाला.

- Advertisement -

भारत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. त्यावेळी भारताने भुवनेश्वरऐवजी उमेश यादवला संधी दिली. त्यामुळे भुवनेश्वर या कसोटी मालिकेसाठी किती फिट होता याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. त्याबाबत तो म्हणाला, मी फिट होतो. पण, सामना खेळण्यासाठी 100 टक्के फिट नव्हतो. कसोटी सामन्यात तुम्हाला 5 दिवस खेळावे लागते आणि मी 5 दिवस खेळण्यासाठी पूर्णपणे तयार होत नव्हतो. मात्र, आता मी पूर्ण फिट झालो आहे.

गेले काही दिवस महेंद्रसिंग धोनीने कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करावी याबाबत बरीच चर्चा होत आहे. भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली तर भारताला फायदा होईल, असे म्हणाला होता. धोनी कोणत्या क्रमांकावर खेळावा, असे भुवनेश्वरला विचारले असता तो म्हणाला, मला काय वाटते याने काही फरक पडणार नाही. धोनीने कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करावी हा निर्णय संघ व्यवस्थापनाचा आहे. माझ्या मते धोनी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्याला जेव्हा फलंदाजीची संधी मिळते तेव्हा तो त्या संधीचा फायदा घेतो, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -