IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीच्या टीकाकारांची कीव येते – सय्यद किरमाणी

धोनीला ७ सामन्यांत केवळ ११२ धावा करता आल्या आहेत.   

ms dhoni
महेंद्रसिंग धोनी

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला यंदाच्या आयपीएल मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. धोनी हा भारतीय क्रिकेट आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक-फलंदाज मानला जातो. त्यामुळे चाहत्यांना नेहमीच त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात. यंदा मात्र धोनीला या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. त्याने आतापर्यंत ७ सामन्यांत केवळ ११२ धावा केल्या असून त्याला फटकेबाजीही करता आलेली नाही. याचा फटका चेन्नई सुपर किंग्स संघाला बसत आहे. त्यामुळे धोनीवर बरीच टीका होत आहे. मात्र, धोनीवर टीका करणे योग्य नसून टीकाकारांची मला कीव येते, असे भारताचे माजी क्रिकेटपटू सय्यद किरमाणी म्हणाले.

वेळेनुसार गोष्टी बदलतात

‘प्रत्येकच खेळाडूच्या कारकिर्दीत अशी वेळ येते, जेव्हा तो पुढे जात असतो, त्याची प्रगती होत असती. तसेच त्याच्या कारकिर्दीत अशीही वेळ येते, जेव्हा त्याची कामगिरी खालावत जाते. तो खेळाडू अपेक्षित कामगिरी करू शकत नाही. वेळेनुसार गोष्टी बदलत जातात. त्यामुळे धोनीवर टीका करणाऱ्यांची मला कीव येते. धोनी हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फिनिशर्सपैकी एक आहे, हे आपण विसरता कामा नये. तो बराच काळ क्रिकेट खेळला नव्हता. याचा परिणाम त्याच्या खेळावर होणार हे अपेक्षितच आहे,’ किरमाणी म्हणाले. ३९ वर्षीय धोनीला फिनिशर म्हणून अजून यंदाच्या आयपीएलमध्ये आपली छाप पाडता आलेली नाही. ‘धोनी ज्या वयाचा आहे, त्या वयात तुमच्या हालचाली थोड्या संथ होतात. तसेच खेळाडू भविष्याबाबत चिंता करत असतो. त्यामुळे धोनीला चांगली कामगिरी करता येत नाही हे समजण्यासारखे आहे,’ असेही किरमाणी यांनी सांगितले.