IPL 2020 : निकालाचा विचार नाही; जसप्रीत बुमराहने सांगितले यशाचे रहस्य 

दिल्लीविरुद्ध बुमराहने अवघ्या १४ धावांत ४ विकेट घेतल्या.   

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून का ओळखला जातो, याचा प्रत्यय आयपीएल क्वालिफायर-१ च्या सामन्यात आला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात बुमराहने ४ षटकांत अवघ्या १४ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट घेतल्या. त्याने शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि मार्कस स्टोईनिस या दिल्लीच्या प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवल्याने मुंबई इंडियन्सचा विजय सुकर झाला. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा बुमराहला आनंद होता.

संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आनंद आहे. मी विकेट घेण्यावर जास्त लक्ष देत नाही. आम्ही (मुंबई) आयपीएल जिंकलो आणि मी विकेट घेतली नसेल, तरी मी खुश असेन. माझ्यासाठी संघाचे यश जास्त महत्त्वाचे आहे. संघाने माझ्यावर विशिष्ट जबाबदारी टाकली असून ती चोख बजावण्याचा मी प्रयत्न करतो. मी कधीही, कोणत्याही क्षणी गोलंदाजी करण्यास तयार असतो. मी निकालाचा विचार करत नाही. मी जेव्हाही निकालावर अधिक लक्ष दिले आहे, तेव्हा माझी कामगिरी खालावली आहे, असे बुमराह म्हणाला.

बुमराहने दिल्लीच्या डावातील दुसऱ्याच षटकात अप्रतिम यॉर्कर टाकत धवनला माघारी पाठवले. सुरुवातीला यॉर्कर टाकणे खूप महत्त्वाचे होते. जेव्हा तुम्ही योजना आखता आणि त्या योजनेला यश मिळते, तेव्हा खूप आनंद होतो, असे बुमराहने सांगितले. बुमराहने यंदाच्या आयपीएलमध्ये अप्रतिम खेळ केला असून सर्वाधिक विकेट (१४ सामन्यांत २७) घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे.