गोलंदाजी न करण्याविषयी हार्दिक पांड्या म्हणतो, ‘मला फरक नाही पडत’! 

हार्दिकने यंदा एकही षटक टाकले नाही. 

hardik pandya
हार्दिक पांड्या 

मुंबई इंडियन्सचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पांड्याने आयपीएलच्या तेराव्या मोसमात एकही षटक टाकले नाही. मागील वर्षीच्या अखेरीस त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तो अजून पूर्णपणे फिट झालेला नसल्यानेच त्याने गोलंदाजी करणे टाळले. मात्र, गोलंदाजी न केल्याने मला फारसा फरक पडला नाही, असे विधान हार्दिकने केले. भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी हार्दिकची भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र, त्याच्या फिटनेसबाबत काही प्रश्न असल्याने त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आलेला नाही.

आयपीएलमध्ये गोलंदाजी न करू शकल्याने मला फारसा फरक पडला नाही. मी जे करतो, त्याचा आनंद घेतो. माझ्यासाठी संधीचे सोने करणे सर्वात महत्त्वाचे आहे. मी सरावावर विशेष लक्ष देतो. आमच्या (मुंबई इंडियन्स) प्रत्येकच खेळाडूने सामन्यागणिक खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. मी यावर्षी गोलंदाजी करू शकलो नाही. मात्र, मला माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे, असे हार्दिक म्हणाला. हार्दिकने फलंदाजीत चांगला खेळ करताना मुंबईकडून १४ सामन्यांत १७९ च्या स्ट्राईक रेटने २८१ धावा केल्या.

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये हार्दिकच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तो जवळपास वर्षभर मैदानाबाहेर राहिला. हार्दिकने त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकला. मात्र, आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो भारताकडून पुन्हा खेळताना दिसेल.