कोहलीविरुद्ध खेळायला आवडले असते – बोथम

Mumbai

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून ५० हून अधिकच्या सरासरीने धावा करणारा जागतिक क्रिकेटमधील एकमेव फलंदाज असून त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके केली आहेत. त्यामुळे अनेक क्रिकेट समीक्षकांच्या मते तो या पिढीतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. मात्र, तो कोणत्याही काळात यशस्वी झाला असता असे इंग्लंडचे माजी कर्णधार इयन बोथम यांना वाटते. मला कोहलीविरुद्ध खेळायला आवडले असते असेही ते म्हणाले.

कोहली कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाही. तो प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. तसेच तो आपल्या खेळाडूंच्या बाजूने उभा राहतो. मला त्याच्याविरुद्ध खेळायला आवडले असते. भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी कोहली हा योग्य व्यक्ती आहे, असे बोथम म्हणाले. बोथम हे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानले जातात. आता जागतिक क्रिकेटमध्ये प्रतिभावान अष्टपैलू खेळाडूंची कमतरता आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आमच्या काळात माझ्यासह रिचर्ड हॅडली, कपिल देव, इम्रान खान असे उत्कृष्ट अष्टपैलू होते. अष्टपैलू असल्याने तुमच्यावर दुहेरी जबाबदारी असते. याचा शरीरावर खूप ताण पडतो. कपिलने भारतातील खेळपट्ट्यांवर आणि उष्ण वातावरणात जी कामगिरी केली, तशी कामगिरी आताच्या काळातील कोणताही खेळाडू करू शकत नाही, असे बोथम यांनी सांगितले.