घरक्रीडाविराट पुन्हा ‘९००’ पार

विराट पुन्हा ‘९००’ पार

Subscribe

आयसीसी कसोटी क्रमवारी

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत नाबाद २५४ धावांची खेळी केली. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी होती. या खेळीमुळे त्याने आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान कायम राखले आहे. तसेच त्याने पुन्हा ९०० गुणांचा टप्पा पार केला आहे. पहिल्या कसोटीत चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आल्याने कोहलीचे जानेवारी २०१८ नंतर पहिल्यांदा गुण ९०० पेक्षा कमी झाले होते. कोहलीच्या खात्यात सध्या ९३६ गुण असून अव्वल स्थानी असणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथचे ९३७ गुण आहेत.

स्मिथने अ‍ॅशेस मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थानी झेप घेतली होती. या मालिकेच्या ४ सामन्यांत स्मिथने ७७४ धावा केल्या होत्या. मात्र, आता कोहलीला पुन्हा अव्वल स्थानावर जाण्याची संधी मिळणार आहे. १९ ऑक्टोबरपासून होणार्‍या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीत चांगला खेळ केल्यास कोहली अव्वल स्थानी झेप घेऊ शकेल. तसेच फलंदाजांच्या यादीत भारताचा चेतेश्वर पुजारा चौथ्या (८१७ गुण), तर अजिंक्य रहाणे नवव्या (७२१ गुण) स्थानी आहे.

- Advertisement -

गोलंदाजांमध्ये ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला तीन स्थानांची बढती मिळाली असून त्याने दहाव्या स्थानावरून सातव्या स्थानी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ८ विकेट्स मिळवणार्‍या अश्विनने दुसर्‍या कसोटीत ६ गडी बाद केले होते. त्याच्या खात्यात सध्या ७९२ गुण आहेत. भारताचा जसप्रीत बुमराह तिसर्‍या स्थानी कायम आहे. तो दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळू शकलेला नाही. अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताचा रविंद्र जाडेजा ४१४ गुणांसह दुसर्‍या स्थानी कायम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -