प्रदर्शन सुधारले नाही तर इतरांना देणार संधी !

नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाला. त्यामुळे भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी खेळाडूंना प्रदर्शन सुधारा नाहीतर नवीन खेळाडूंना संधी देऊ अशी ताकीद दिली आहे.

Mumbai
सौजन्य - NDTV Sports

भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौऱ्यातील प्रदर्शनावर साऱ्या क्रिकेट चाहत्यांची नजर असते. त्यातही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि द.आफ्रिका या देशांमध्ये भारतीय संघ कसा खेळतो यावर संघ किती चांगला आहे हे ठरते. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने भारतात चांगले प्रदर्शन केले आहे. पण परदेश दौऱ्यांत चित्र काहीसे वेगळे आहे. भारताला मागील दोन परदेश दौऱ्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. आधी द.आफ्रिकेने कसोटी मालिकेत भारताचा २-१ असा पराभव केला. तर नुकतीच पार पडलेली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारताने ४-१ अशी गमावली. त्यामुळे काही खेळाडूंच्या संघातील भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे. त्यातच भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी ‘ टाइम्स ऑफ इंडिया ‘ ला दिलेल्या मुलाखतीत खेळाडूंना प्रदर्शन सुधारा नाहीतर नवीन खेळाडूंना संधी देऊ अशी ताकीद दिली आहे.

भारत ‘अ’ संघातून नवे खेळाडू पुढे येत आहेत 

नव्या खेळाडूंना संधी देण्याबाबत प्रसाद म्हणाले, “इंग्लंडसारख्या कठीण दौऱ्यासाठी आम्ही अनुभवी खेळाडूंसोबतच जाण्याचा निर्णय घेतला. पण संधी देऊनही हे खेळाडू जर चांगले प्रदर्शन करत नसतील तर आम्हाला नव्या खेळाडूंना संधी द्यावी लागेल. याचे कारण आता भारत ‘अ’ संघातून अनेक नवे खेळाडू पुढे येत आहेत.”

इंग्लंड दौऱ्यात संधीचे सोने करू शकलो नाही

भारतीय संघाच्या इंग्लंडमधील प्रदर्शनाबत प्रसाद म्हणाले, “इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताचा पराभव झाला असला तरी ही मालिका जिंकायची भारताला संधी होती. पण या संधीचे भारत सोने करू शकला नाही. मोक्याच्या क्षणी इंग्लंडने भारतापेक्षा चांगला खेळ केला. त्यामुळे त्यांनी ही मालिका इंग्लंडने जिंकली. भारतासाठी काही चांगल्या गोष्टीही होत्या. भारतीय गोलंदाजांनी सगळ्या सामन्यांत चांगला खेळ केला. त्यांनी आपल्या खेळात सातत्य राखले. तर कर्णधार कोहलीनेही अप्रतिम फलंदाजी केली.”