IPL 2020 : वडिलांच्या पाठिंब्यामुळेच पुन्हा क्रिकेट खेळतोय – स्टोक्स 

स्टोक्स पाच आठवडे क्रिकेटपासून दूर होता. 

ben stokes
बेन स्टोक्स

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स यंदाच्या आयपीएल मोसमाला मुकण्याची शक्यता होती. त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने तो त्यांच्यासोबत न्यूझीलंडमध्ये होता. तो पाच आठवडे क्रिकेटपासून दूर राहिला. मात्र, वडिलांनी त्याला पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यास सांगितले आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच स्टोक्सने पुन्हा क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. तो काही दिवसांपूर्वी युएईमध्ये दाखल झाला होता. तसेच तो आवश्यक तितका काळ क्वारंटाईनमध्ये राहिला. तो १० ऑक्टोबरनंतरच्या सामन्यात खेळण्याची दाट शक्यता असल्याचे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ मंगळवारी म्हणाला. तो उपलब्ध झाल्यावर थेट संघामध्ये परतू शकेल.

बाहेरच्या व्यक्तीचा हस्तक्षेप नव्हता

ख्राईस्टचर्चला राहणारे माझे वडील, आई आणि भावाला निरोप देणे सोपे नव्हते. आमच्यासाठी कुटुंब म्हणून हा कठीण काळ होता. परंतु, आम्ही एकत्र येऊन परिस्थितीचा सामना केला. माझ्या आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच मी पुन्हा मैदानावर परतण्याचा निर्णय घेऊ शकलो. यात बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप नव्हता. माझ्यावर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत याची मला वडिलांनी आठवण करून दिली. ‘तू क्रिकेटपटू म्हणून तुझे काम केलेच पाहिजेस. तसेच पती आणि वडील म्हणून असलेली जबाबदारीही योग्यपणे पार पाडली पाहिजेस’, असे ते मला म्हणाले. आम्ही खूप चर्चा केली आणि अखेर मी पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली पाहिजे या निष्कर्षावर पोहोचलो, असे स्टोक्सने एका वृत्तपत्रातील आपल्या लेखात लिहिले.