घरक्रीडामलाही इतरांप्रमाणे राग येतो, पण...

मलाही इतरांप्रमाणे राग येतो, पण…

Subscribe

‘कॅप्टन कूल’ धोनीचे विधान

सामन्यात कितीही आव्हानात्मक परिस्थिती असो, पण संयम राखून शांतपणे योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जातो. तसेच सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये कितीही धावा करायच्या असल्या तरी दडपण न घेता फटकेबाजी करत त्याने भारताला अनेक सामने जिंकवले आहेत. मलाही इतरांप्रमाणे राग येतो, दबाव जाणवतो, पण माझे माझ्या भावनांवर नियंत्रण आहे, असे विधान धोनीने केले.

मलाही इतरांप्रमाणेच भावना आहेत. मात्र, माझे माझ्या भावनांवर इतर लोकांपेक्षा जास्त नियंत्रण आहे. मीसुद्धा निराश होतो. मलाही बर्‍याचदा राग येतो. परंतु, मला या भावना लपवता येतात असे म्हणता येईल. आता जी परिस्थिती आहे, त्यात मी काय केले पाहिजे, मी यापुढे कशाबाबत योजना आखली पाहिजे, कोणत्या खेळाडूचा या परिस्थितीत योग्य वापर करून घेता येऊ शकेल, या गोष्टींना भावनांपेक्षा जास्त महत्त्व असते. कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला पुढील योजना आखण्यासाठी बराच वेळ मिळतो. मात्र, टी-२० क्रिकेटमध्ये तुम्ही झटपट विचार करणे आवश्यक असते, असे धोनीने सांगितले.

- Advertisement -

धोनीच्या नेतृत्वात भारताने दोन विश्वचषक जिंकले (२००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय) आहेत. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २००७ विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा ‘बॉल आऊट’मध्ये पराभव केला होता. याबाबत धोनीला विचारले असता त्याने सांगितले, तो विश्वचषक आमच्यासाठी खास होता. ‘बॉल आऊट’ हा प्रकार केवळ त्याच विश्वचषकात घडला. मला अजूनही आठवते की, आम्ही प्रत्येक सराव सत्राला सुरुवात करण्याआधी किंवा संपल्यानंतर ‘बॉल आऊट’चा सराव करायचो. आम्ही तेव्हाच ठरवले होते की, जो खेळाडू सर्वाधिक वेळा त्रिफळा उडवेल, तोच खेळाडू खर्‍या सामन्यातील ‘बॉल आऊट’मध्ये चेंडू टाकेल. तुम्ही गोलंदाज आहात की फलंदाज याला महत्त्व नव्हते.

खेळाडूपेक्षा कधीही संघच महत्त्वाचा!

- Advertisement -

एखाद्या खेळाडूच्या कामगिरीपेक्षा संघाचे यश कधीही महत्त्वाचे असते, असे धोनीला वाटते. पराभव आणि विजय याचा संघातील प्रत्येक खेळाडूवर परिणाम होतो. सांघिक खेळांमध्ये प्रत्येक खेळाडूला काही जबाबदार्‍या दिलेल्या असतात आणि त्यांनी त्यानुसार खेळणे गरजेचे असते. २००७ टी-२० विश्वचषकादरम्यान प्रत्येक खेळाडूला काही भूमिका दिली होती आणि त्यांनी ती योग्यपणे बजावली. त्यामुळेच आम्ही ती स्पर्धा जिंकू शकलो. सांघिक खेळांमध्ये काही खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीपेक्षा संघाच्या यशाला महत्त्व असते. संघाच्या यशात सर्वांनी योगदान द्यावे अशी तुमची अपेक्षा असते, असे धोनी म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -