लिव्हरपूल, बार्सिलोना उपांत्यपूर्व फेरीत

Mumbai
युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धा

इंग्लिश संघ लिव्हरपूल आणि स्पॅनिश संघ बार्सिलोना यांनी युएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीचे पहिले लेग ०-० असे बरोबरीत संपल्यानंतर दुसर्‍या लेगमध्ये लिव्हरपूलने बायर्न म्युनिकचा ३-१ असा तर बार्सिलोनाने फ्रेंच संघ लियोनचा ५-१ असा धुव्वा उडवला.

लिव्हरपूल आणि बायर्न म्युनिक यांच्यातील उप-उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीतील लिव्हरपूलमध्ये झालेल्या पहिला लेगमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. मात्र, दुसर्‍या लेगमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात केली. सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत दोन्ही संघांना गोल करण्याच्या काही संधी मिळाल्या. मात्र. त्यांना गोल करता आला नाही. सामन्याच्या २६ व्या मिनिटाला वर्जिल वॅन डाईकच्या अप्रतिम पासवर साडीयो मानेने गोल करत लिव्हरपूलला आघाडी मिळवून दिली. त्यांची ही आघाडी १३ मिनिटेच टिकली. सामन्याच्या ३९ व्या मिनिटाला जोएल माटीपने केलेल्या स्वयं गोलमुळे बायर्नने १-१ अशी बरोबरी केली.

मध्यांतरापर्यंत सामन्यात बरोबरीच होती. मध्यांतरानंतर बायर्नचा स्ट्रायकर रॉबर्ट लेवान्डोस्कीला गोल करण्याची संधी होती. मात्र, त्याने मारलेला फटका गोलच्या वर गेला. यानंतर ६९ व्या मिनिटाला लिव्हरपूलला कॉर्नर मिळाला. जेम्स मिल्नरच्या क्रॉसवर वॅन डाईकने हेडर मारत लिव्हरपूलला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर हा सामना जिंकण्यासाठी बायर्नला २ गोलची गरज असताना त्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना गोलच्या संधी निर्माण करता आल्या नाहीत. अखेर ८४ व्या मिनिटाला मोहम्मद सलाहच्या क्रॉसवर साडीयो मानेने हेडर मारत आपला दुसरा आणि लिव्हरपूलचा तिसरा गोल केला. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत राखत हा सामना ३-१ असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

बार्सिलोना आणि लियोन यांच्यातील उप-उपांत्यपूर्व फेरीचा दुसर्‍या लेग बार्सिलोनाने ५-१ असा जिंकला. या सामन्यात सुरुवातीपासूनच बार्सिलोनाने आक्रमण केला. याचा फायदा त्यांना १७ व्या मिनिटाला मिळाला. जेसन डिनायरने लुईस सुवारेझला पेनल्टी बॉक्समध्ये पडल्यामुळे बार्सिलोनाला पेनल्टी मिळाली. यावर गोल करत लिओनेल मेस्सीने बार्सिलोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ३१ व्या मिनिटाला सुवारेझच्या पासवर फिलिपे कुटिनियोने गोल करत बार्सिलोनाची आघाडी २-० अशी केली. मध्यांतरानंतर लियोनने चांगला खेळ करत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. ५८ व्या मिनिटाला लियोनच्या लुकास टोर्सेटने गोल करत बार्सिलोनाची आघाडी १-२ अशी कमी केली. मात्र, ७८ व्या मिनिटाला मेस्सीने, ८१ व्या मिनिटाला जेरार्ड पिके आणि ८६ व्या मिनिटाला ओस्मान डेमबेलेने यांनी गोल करत बार्सिलोनाला ५-१ असा विजय मिळवून दिला.

लिव्हरपूल आणि बार्सिलोनासोबत ज्युव्हेंटस, मँचेस्टर सिटी, मँचेस्टर युनायटेड, टॉटनहॅम, पोर्टो, आयेक्स या संघांनी उपांत्य फेरीत धडक दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here