घरक्रीडाIND vs AUS : कांगारूंवर भारताची स्वारी 

IND vs AUS : कांगारूंवर भारताची स्वारी 

Subscribe

भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात ३१ धावांनी पराभव केला. त्यामुळे भारताने ४ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. 

मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात ३१ धावांनी पराभव केला. त्यामुळे भारताने ४ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयामुळे विराट कोहली हा द.आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांत कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. तसेच ७१ वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कसोटी मालिकेचा पहिला सामना भारताने जिंकला आहे. तर २००८ नंतर प्रथमच भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकला आहे.

मार्शची संयमी फलंदाजी

हा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताने ऑस्ट्रेलियाला चौथ्या डावात ३२३ धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाची चौथ्या दिवसाअखेर ४ बाद १०४ अशी धावसंख्या होती. त्यामुळे पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी २१९ धावांची तर भारताला ६ विकेटची गरज होती. ऑस्ट्रेलियाची पाचव्या दिवसाची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या दिवसाअखेर ११ धावांवर नाबाद असलेल्या ट्रेव्हिस हेडला आपल्या धावसंख्येत अवघ्या ३ धावांची भर घालता आली. १४ धावांवर त्याला इशांत शर्माने माघारी पाठवले. यानंतर शॉन मार्श आणि कर्णधार टीम पेन यांनी चांगली फलंदाजी केली. मार्शने संयमाने फलंदाजी करत १४६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण बुमराहने मार्शला ६० धावांवर बाद करत ही जोडी फोडली. यानंतर काही वेळातच बुमराहनेच पेनला ४१ धावांवर बाद केले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची ७ बाद १८७ अशी अवस्था होती. ऑस्ट्रेलियाचे सर्व मुख्य फलंदाज तंबूत परतल्यामुळे भारत लवकरच हा सामना जिंकेल असे वाटत होते. पण तसेच झाले नाही. ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलीच झुंज दिली.

पंतचा विक्रम 

पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क या जोडीने आठव्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. पण स्टार्कला २८ धावांवर शमीने यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केले. हा पंतचा या सामन्यातील ११ वा झेल होता. त्यामुळे भारतासाठी एका कसोटीत सर्वाधिक झेप पकडण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. याआधी हा विक्रम वृद्धिमान साहाच्या नावे होता. त्याने द.आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात १० झेल पकडले होते. तसेच ११ झेल पकडत पंतने एका कसोटीत सर्वाधिक झेल पकडण्याच्या जॅक रसेल आणि एबी डी विलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी केली.

लायन-हेझलवूडची झुंजार खेळी

स्टार्क बाद झाल्यानंतरही कमिन्सने आपली संयमी खेळी सुरु ठेवली. पण बुमराहच्या चेंडूवर खराब फटका मारून तो २८ धावांवर झाला. तो बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी अजून ६४ धावांची गरज होती. पुढे लायनने आक्रमक फलंदाजी करत ४७ चेंडूंत ३८ धावा केल्या. त्याला जॉश हेझलवूडने चांगली साथ दिली. त्यामुळे अखेरची विकेट मिळण्यासाठी भारताला बरीच वाट पाहावी लागली. मात्र जिंकण्यासाठी ३२ धावांची गरज असताना अश्विनने हेझलवूडला बाद करत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्याच्या पहिल्या डावात १२३ आणि दुसऱ्या डावात ७१ धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या मालिकेतील दुसरा सामना १४ डिसेंबरपासून पर्थ येथे होईल.
संक्षिप्त धावफलक –
भारत : २५० आणि सर्वबाद ३०७ वि. ऑस्ट्रेलिया २३५ आणि २९१ (शॉन मार्श ६०, टीम पेन ४१; शमी ३/६५, बुमराह ३/६८, अश्विन ३/९२).
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -