पहिली कसोटी भारताच्या नावावर, विंडीजवर दणदणीत विजय!

भारताने पहिल्या कसोटी सामन्यामध्ये वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचं कंबरडं मोडत दणदणीत विजय मिळवला आहे.

North Sound
ind vs wi test match
५ विकेट घेऊन विंडीजच्या फलंदाजीचं कंबरडं मोडणारा जसप्रीत बुमराह!

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये पहिल्याच कसोटी सामन्यात टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजला तब्बल ३१८ धावांनी पराभूत करत मालिकेमध्ये १-० अशी आघाडी भारतानं घेतली आहे. अजिंक्य रहाणेचं दमदार शतक आण हनुमा विहिरीच्या ९३ धावांच्या जोरावर भारतानं वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ४१८ धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १०० धावांवर आटोपला आणि भारताच्या पारड्यात पहिली कसोटी अगदी अलगद आली. दमदार शतक झळकावणाऱ्या अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आलं. अजिंक्य रहाणेचं हे कारकिर्दीतलं दहावं शतक होतं. पहिल्या इनिंगमध्ये देखील अजिंक्य रहाणेनं ८१ धावा करत विंडिजच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते.

विंडीजच्या फलंदाजांनी टाकली नांगी

पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया २९७ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ २२२ धावांवरच गारद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने ७ बाज ३४३ धावांवर आपला डाव घोषित केला. अजिंक्य रहाणेच्या १०२ धावांसोबतच हनुमा विहारीने केलेल्या ९३ धावा भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सर्वाधिक महत्त्वाच्या ठरल्या. याशिवाय कर्णधार विराट कोहलीच्या ५१ धावांनी देखील महत्त्वाचं योगदान दिलं. जिंकण्यासाठी ३१८ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर अक्षरश: नांगी टाकली. सुरुवातीपासूनच त्यांचा डाव कोसळता तो पुन्हा सावरलाच नाही. अवघ्या २७ ओव्हरमध्ये वेस्टइंडिजचे सर्व फलंदाद १०० धावांमध्ये माघारी परतले. विशेष म्हणजे पहिल्या पाच फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या देखील गाठता आली नाही. केमार रोचने शेवटी येऊन तग धरून केलेल्या ३८ धावांच्या जोरावर विंडीजने १०० धावांपर्यंत मजल मारली.


हेही वाचा – रंगतदार कसोटी सामन्यांसाठी चांगल्या खेळपट्ट्या महत्त्वाच्या!

भारताकडून दुसऱ्या डावात बुमराने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा(३ विकेट) आणि मोहम्मद शमी(२ विकेट) यांनी उरलेलं काम पूर्ण केलं.