घरक्रीडातब्बल ८ विकेट्स राखत वेस्ट इंडिजची भारतावर मात

तब्बल ८ विकेट्स राखत वेस्ट इंडिजची भारतावर मात

Subscribe

शिमरॉन हेटमायर आणि शाई होप या युवा फलंदाजांच्या अप्रतिम शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर ८ विकेट राखून मात केली. या विजयामुळे विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. विंडीजने टी-२० मालिका गमावल्यानंतर आमचे युवा फलंदाज त्यांच्या खेळात सुधारणा करतील अशी आशा कर्णधार किरॉन पोलार्डने व्यक्त केली होती. एकदिवसीय मालिकेच्या पहिल्याच सामन्यात दोन युवा फलंदाजांनी जबाबदारीने खेळ करत विंडीजला विजय मिळवून दिला.

भारतीय संघाने हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजसमोर २८८ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना विंडीजचा सलामीवीर सुनील अँब्रिसला अवघ्या ९ धावांवर दीपक चहरने पायचीत पकडले. मात्र, यानंतर भारताच्या गोलंदाजांना हेटमायर आणि होपला अडचणीत टाकण्यात अपयश आले. या दोघांनी सुरुवातीला सावध फलंदाजी केल्याने पहिल्या १० षटकांत विंडीजची १ बाद ३६ अशी धावसंख्या होती. होपने एका बाजूने सावध फलंदाजी केली. मात्र, हेटमायरने खेळपट्टीवर काही काळ घालवल्यानंतर आक्रमक शैलीत फलंदाजी केली. त्याने ५० चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. त्यानंतर त्याने धावांची गती वाढवली. त्यामुळे त्याने अवघ्या ८६ चेंडूत आपले शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील पाचवे शतक होते.

- Advertisement -

होपने आपले अर्धशतक करण्यासाठी तब्बल ९२ चेंडू घेतले. अखेर हेटमायर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात माघारी परतला. त्याने १०६ चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १३९ धावांची खेळी केली. तसेच त्याने आणि होपने दुसऱ्या विकेटसाठी २१८ धावांची भागीदारी केली. होपने मात्र एक बाजू लावून धरत १४९ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील सातवे शतक ठरले. त्याने आणि निकोलस पूरनने (२३ चेंडूत नाबाद २९) उर्वरित धावा करत ४८ व्या षटकात विंडीजला विजय मिळवून दिला.

भारतीय संघाची आजची सुरुवात अपेक्षेसारखी होऊ शकली नाही. सलामीवीर लोकेश राहुल सहाव्याच षटकांत अवघ्या ६ धावांवर बाद झाला. त्यावेळी भारताच्या २१ धावा झाल्या होत्या. त्यानंतर त्याच षटकांत कोट्रेलाने कर्णधार विराट कोहलीचा त्रिफळा उडवला. त्यामुळे फक्त एक चौकार मारुन विराटला तंबूत परतावे लागले. सलामीवीर रोहित शर्माने श्रेयस अय्यर सोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहितही ३६ धावांवर बाद झाला. त्याने ५६ चेंडूत ६ चौकारही मारले. मात्र, उंच फटका मारण्याच्या नादात कोट्रेलाच्या चेंडूवर हेटमायरने त्याचा झेल टिपला.

- Advertisement -

यानंतर ऋषभ पंतने श्रेयससोबत डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. मात्र, अल्झारी जोसेफच्या चेंडूवर पोलार्डने झेल टिपत श्रेयस अय्यरला बाद केले. त्याने ८८ चेंडूत ७० धावा केल्या. यात ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. त्यानंतर लगेच ऋषभ पंतही बाद झाला. त्याने ६९ चेंडूत ७१ धावा केल्या. दोघांनंतर केदार जाधवने आक्रमक खेळी केली. त्याने तीन चौकार आणि १ षटकार मारत ४० धावा केल्या. त्यानंतर तो झेलबाद झाला. त्यानंतर रविंद्र जडेजा रनआऊट झाला तर शिवम दुबे ९ धावा करुन झेलबाद झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -