घरक्रीडाIND Vs WIN 3rd ODI : बुमराह, भुवनेश्वरमुळे भारताचे पारडे जड

IND Vs WIN 3rd ODI : बुमराह, भुवनेश्वरमुळे भारताचे पारडे जड

Subscribe

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज पुण्यात पार पडेल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना शनिवारी पुण्यात पार पडेल. या मालिकेचा पहिला सामना भारताने सहजपणे जिंकल्यानंतर विंडीजने दुसऱ्या सामन्यात भारताला चांगला लढा दिला. हा सामना त्यांना बरोबरीत संपवण्यात यश आले होते. त्यामुळे २ सामन्यांनंतर या मालिकेत भारताकडे १-० ची आघाडी आहे. आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांचे पुनरागमन होत आहे. त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे.

दुसऱ्या सामन्यात बरोबरी 

या मालिकेतील पहिला सामना भारताने सहजपणे जिंकला. विंडीजने दिलेल्या ३२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताने अवघ्या ४२ षटकांत करत हा सामना जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद १५७ धावांच्या खेळीमुळे ३२१ धावा केल्या होत्या. याचा पाठलाग करताना शाई होप आणि शिमरॉन हेथमायर या युवा फलंदाजांच्या अप्रतिम खेळींमुळे विंडीजला दुसऱ्या सामन्यात बरोबरी करण्यात यश आले. त्यामुळे त्यांनी आपल्या मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या.

हेथमायर, होपचे चांगले प्रदर्शन

विंडीजकडून शिमरॉन हेथमायर या फलंदाजाने दोन्ही सामन्यांत दमदार प्रदर्शन केले. त्याने पहिल्या सामन्यात १०६ तर दुसऱ्या सामन्यात ९४ धावा केल्या. तर शाई होप पहिल्या सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर (३२) बाद झाला. पण दुसऱ्या सामन्यात त्याने पहिल्या सामन्याची चूक केली नाही. त्याने या सामन्यात नाबाद १२३ धावा केल्या. त्याने विंडीजला शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना चौकार लगावल्यामुळे हा सामना बरोबरीत संपला. या दोघांव्यतिरिक्त इतर विंडीज फलंदाजांना चांगला खेळ करण्यात अपयश आले आहे. तर त्यांचे गोलंदाजही भारतीय फलंदाजांवर दबाव टाकण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे जर विंडीजला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या इतर खेळाडूंनाही चांगला खेळ करण्याची गरज आहे.

धोनी, पंत यांच्यावर दबाव

तर दुसरीकडे जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाची ताकद वाढली आहे. बुमराह आणि भुवनेश्वर महिनाभराच्या विश्रांतीतून परतत असल्याने ते ताजेतवाने असतील. त्यामुळे विंडीज फलंदाजांना धावा करण्यासाठी पहिल्या दोन सामन्यांपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. या दोघांच्या पुनरागमनाचा फायदा संघातील इतर गोलंदाजांनाही होईल. तसेच फलंदाजीत भारताकडून विराट कोहलीने दोन्ही सामन्यांत शतक झळकावत अप्रतिम कामगिरी केली आहे. तर रोहित शर्मा आणि अंबाती रायडू यांनीही चांगली फलंदाजी केली आहे. पण महेंद्रसिंग धोनी आणि रिषभ पंत यांना दुसऱ्या सामन्यात मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर धावा करण्याचा दबाव आहे.
एकूणच बुमराह आणि भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत विंडीजला सामना जिंकण्यात अपयश आल्याने त्यांना आता या दोघांच्या उपस्थितीत हा सामना जिंकणे अधिकच कठीण जाणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -