घरक्रीडाभारताला २०२१ टी-२० वर्ल्डकपचे यजमानपद गमावण्याची भीती नाही!

भारताला २०२१ टी-२० वर्ल्डकपचे यजमानपद गमावण्याची भीती नाही!

Subscribe

बीसीसीआयने केले स्पष्ट

भारतात २०२१ मध्ये होणार्‍या टी-२० विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) भारत सरकारकडून करात सूट हवी आहे. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ती मिळवून देण्यात अपयश आले आहे. कोणत्याही जागतिक स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क देताना होणार्‍या करारामध्ये करात सूट मिळवून देणे ही आयसीसीची अट असते. बीसीसीआयला ही सूट मिळवून देण्यासाठी १८ मेपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, त्यांना त्यात अपयश आल्याने २०२१ टी-२० विश्वचषकाच्या यजमानपदाचे हक्क भारताकडून काढून घेण्याची धमकी आयसीसीने दिली आहे. मात्र, भारताला यजमानपद गमावण्याची भीती नाही, असे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी स्पष्ट केले आहे.

२०२१ मध्ये होणार्‍या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद गमावण्याची आम्हाला भीती नाही. करात सूट मिळवून देण्याबाबत आम्ही अजूनही आयसीसीशी चर्चा करत आहोत. त्यांच्यासोबत मिळून आम्ही काहीतरी मार्ग काढू, असे धुमाळ यांनी सांगितले. आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात करात सूट देण्यावरूनचा वाद नवा नाही. २०१६ टी-२० विश्वचषक भारतात झाला होता आणि त्यावेळीही भारत सरकारने करात सूट देण्याला नकार दिला होता. यंदाही यात बदल झालेला नाही. त्यामुळे आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यातील वाद आता अधिकच चिघळत चालला आहे. मात्र, आयसीसी घाईने कोणताही निर्णय घेणार नाही याची बीसीसीआयला खात्री आहे. तसेच त्यांनी तडकाफडकी कोणताही निर्णय घेतल्यास त्यात आयसीसीचेच नुकसान आहे, असे बीसीसीआयला वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -