घरक्रीडागोलंदाजांच्या कामगिरीवर नजर!

गोलंदाजांच्या कामगिरीवर नजर!

Subscribe

भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना आज

वर्षानुवर्षे फलंदाजी ही भारतीय क्रिकेट संघाची जमेची बाजू मानली जायची. मात्र, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीसारख्या गोलंदाजांच्या आगमनानंतर गोलंदाजांना फलंदाजांइतके महत्त्व प्राप्त झाले. या गोलंदाजांनी मागील काही वर्षांत भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. परंतु, मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांचा रंग फिका पडला. डेविड वॉर्नर आणि कर्णधार अ‍ॅरॉन फिंच या सलामीवीरांच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना १० विकेट राखून जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. त्यामुळे या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला राजकोट येथे होणारा दुसरा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर २५६ धावांचे आव्हान ठेवले. वॉर्नर आणि फिंच या अनुभवी जोडीने सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर हल्ला चढवला. भारताच्या एकाही गोलंदाजाला त्यांना अडचणीत टाकता आले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना १० विकेट राखून अवघ्या ३७.४ षटकांत जिंकला. आता भारताला या मालिकेत पुनरागमन करायचे असल्यास गोलंदाजांनी आपली कामगिरी सुधारणे गरजेचे आहे.

- Advertisement -

जसप्रीत बुमराह सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र, त्यालाही ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फोडता आली नाही. तर त्याने ७ षटकांत ५० धावा खर्ची केल्या. शमी आणि शार्दूल यांना योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्यात अपयश आले. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला संधी मिळू शकेल. तसेच पहिल्या सामन्यात ५५ धावा खर्ची करणार्‍या कुलदीप यादवच्या जागी लेगस्पिनर युजवेंद्र चहलला संघात स्थान मिळू शकेल.

दुसरीकडे रिषभ पंत या सामन्याला मुकणार असून लोकेश राहुल यष्टिरक्षणाची धुरा सांभाळेल. पंतच्या अनुपस्थितीत मनीष पांडे, केदार जाधव आणि शिवम दुबे यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. तसेच पहिल्या सामन्यात राहुल, शिखर धवन आणि रोहित शर्मा या तिन्ही फॉर्मात असलेल्या सलामीवीरांना खेळता यावे यासाठी संघ व्यवस्थापनाने कोहलीला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय घेतला. धवन (७४) आणि राहुल (४७) यांनी चांगल्या सुरुवातीनंतर आपल्या विकेट फेकल्या. तर कोहलीला केवळ १६ धावा करता आल्याने सामन्यानंतर संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर बरीच टीका झाली. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात कोहली तिसर्‍या क्रमांकावर खेळू शकेल. एकूणच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात सलग दुसर्‍यांदा एकदिवसीय मालिका गमवायची नसल्यास भारताला दुसर्‍या सामन्यात आपला खेळ उंचवावा लागेल.

- Advertisement -

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), मनीष पांडे, शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर.

ऑस्ट्रेलिया : अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), डार्सी शॉर्ट, अ‍ॅश्टन एगर, अ‍ॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लबूशेन, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टन टर्नर, डेविड वॉर्नर, अ‍ॅडम झॅम्पा.

सामन्याची वेळ : दुपारी १.३० पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -