घरक्रीडारोहितमुळे भारत बरेच कसोटी सामने जिंकू शकेल!

रोहितमुळे भारत बरेच कसोटी सामने जिंकू शकेल!

Subscribe

कर्णधार कोहलीला विश्वास

भारताच्या रोहित शर्माने कसोटीत पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावांत शतके (१७६ आणि १२७) झळकावली. त्याने पहिल्या डावात सुरुवातीला संयमाने फलंदाजी केली आणि खेळपट्टीवर वेळ घालवल्यानंतर फिरकीपटूंविरुद्ध फटकेबाजी केली. भारताला आघाडी मिळाल्यामुळे दुसर्‍या डावात रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. रोहितने पुढेही अशीच कामगिरी सुरू ठेवल्यास भारत बरेच कसोटी सामने जिंकू शकेल, असे मत कर्णधार विराट कोहलीने दुसर्‍या कसोटीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले.

रोहितसारखा खेळाडू डावाच्या सुरुवातीला आपल्या आक्रमक शैलीत खेळला, तर भारताला बरेच कसोटी सामने जिंकण्याची संधी निर्माण होईल. त्याच्यासाठी आम्हाला सर्वांनाच आनंद होत आहे. त्याने पहिल्या कसोटीत फारच उत्कृष्ट फलंदाजी केली. तो खूप संयमाने खेळला आणि हे पाहून मला बरे वाटले. बरीच वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्याने त्याच्या गाठीशी खूप अनुभव आहे. याचा त्याला फायदा झाला, असे कोहलीने सांगितले.

- Advertisement -

तसेच तो पुढे म्हणाला, रोहित कसोटीत कशी कामगिरी करणार यावर फार लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही. त्याने किती चांगली कामगिरी केली हे आपण सर्वांनी पाहिले. त्यामुळे त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटप्रमाणेच आता कसोटी क्रिकेटचा आनंद उपभोगू देण्याची वेळ आली आहे.

शमीला आता जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागत नाही!

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या डावात ५ विकेट्स मिळवल्या. त्याने मागील २-३ वर्षांत केलेल्या कामगिरीचे कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले. शमीला आता जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागत नाही. आम्हाला तुझ्या गोलंदाजीची गरज आहे, असे आता त्याला सांगावे लागत नाही. त्याला स्वतःलाच गोलंदाजी करायची असते. मी जेव्हा त्याच्या हातात चेंडू देतो, तेव्हा त्या परिस्थितीत काय केले पाहिजे हे त्याला कळते, असे कोहली म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -