घरक्रीडामालिका एक, प्रश्न अनेक

मालिका एक, प्रश्न अनेक

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमधील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून या मालिकेकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आहे. त्यातच ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळली जाणार असल्याने या चार सामन्यांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. परंतु, ही मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघ व्यवस्थापनापुढे बरेच प्रश्न असून त्यांची उत्तरे शोधण्यासाठी फारसा वेळ शिल्लक नाही.         

भारतीय संघाच्या बहुचर्चित ऑस्ट्रेलिया दौऱ्याला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली. भारताला या दौऱ्याच्या सुरुवातीला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्यांनी पहिले दोन एकदिवसीय सामने गमावत ही मालिकाही गमावली. त्यानंतर मात्र भारतीय संघाचा खेळ सुधारला. त्यांनी अखेरचा एकदिवसीय सामना जिंकला आणि त्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला. याचा फायदा त्यांना टी-२० मालिकेत झाला. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकत तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत बाजी मारली. परंतु, भारताच्या ऑस्ट्रेलियाला दौऱ्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमधील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून या मालिकेकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आहे. कोहलीच्या भारतीय संघाने मागील वर्षी (२०१८-१९) पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. मात्र, स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर हे ऑस्ट्रेलियन फलंदाजीचे आधारस्तंभ त्या मालिकेत खेळले नव्हते. त्यामुळेच भारताने ही मालिका जिंकल्याचे काही क्रिकेट समीक्षकांनी बोलून दाखवले. आता स्मिथ आणि वॉर्नर यांचे संघात पुनरागमन झाल्याने यंदाच्या मालिकेत यजमानांचे पारडे जड मानले जात आहे. भारतीय संघ मात्र मागील वर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास नक्कीच उत्सुक असेल. परंतु, ही मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघ व्यवस्थापनापुढे बरेच प्रश्न असून त्यांची उत्तरे शोधण्यासाठी फारसा वेळ शिल्लक नाही.

- Advertisement -
  • मयांकचा सलामीचा साथी कोण?

भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. रोहित आता फिटनेस चाचणीत उत्तीर्ण झाला असला तरी तो पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा मयांक अगरवाल यंदाही सलामीवीराची भूमिका पार पडणार हे निश्चितच आहे. मात्र, रोहितच्या अनुपस्थितीत त्याचा सलामीचा साथी कोण असणार? हा मोठा प्रश्न आहे. भारताकडे सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल या युवकांसह अनुभवी लोकेश राहुलचा पर्याय आहे. पृथ्वीने त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात शतकाने केली होती. त्यानंतर मात्र त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीचे सोने करता आलेले नाही. शुभमन गिल मागील काही काळापासून भारतीय संघाचा भाग आहे. मात्र, तो अजून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. लोकेश राहुल एक वर्षाहूनही जास्त काळ कसोटी संघाच्या बाहेर आहे. परंतु, राहुलने ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावले असून ही गोष्ट त्याच्या पथ्यावर पडू शकेल.

  • वृद्धिमान साहा की रिषभ पंत?

महेंद्रसिंग धोनीनंतर भारताचा प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात होते. पंतने त्याच्या कसोटी कारकिर्दीची दमदार सुरुवात करताना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात शतके केली होती. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पंत (३५० धावा) दुसऱ्या स्थानी होता. परंतु, त्यानंतर त्याला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. तसेच त्याने यष्टिरक्षणातही बऱ्याच चुका केल्या. त्यामुळे त्याने संघातील स्थान गमावले. त्याच्या जागी अनुभवी वृद्धिमान साहाचे कसोटी संघात पुनरागमन झाले. पंत आणि साहा यांच्यात फलंदाज म्हणून पंत वरचढ असला तरी यष्टिरक्षणाच्या बाबतीत पंत हा साहापेक्षा बराच मागे आहे. ‘केवळ यष्टीरक्षक म्हणून विचार करायचा झाल्यास साहा जगात सर्वोत्तम आहे,’ असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणतात. ऑस्ट्रेलियात यष्टिरक्षकाची भूमिका फार महत्वाची असल्याने कसोटी मालिकेच्या सुरुवातीला तरी साहाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -
  • तिसरा वेगवान गोलंदाज?

आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीमुळे भारताचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. भारताने मागील काही वर्षांत परदेशात चांगली कामगिरी केली असून भारताच्या या यशात ईशांत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या तेज त्रिकुटाने महत्वाची भूमिका बजावली आहे. ईशांतच्या अनुपस्थितीचा उमेश यादव, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज यांना फायदा होऊ शकेल. या तिघांमध्ये उमेशला संधी मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे. बुमराह, शमी आणि ईशांतच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे उमेशला मागील काही काळात फारसे सामने खेळता आलेले नाहीत. मात्र, असे असतानाही त्याच्या गाठीशी ४६ कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. उमेशने भारतानंतर सर्वाधिक विकेट (८ सामन्यांत २७ विकेट) या ऑस्ट्रेलियात घेतल्या आहेत. मात्र, कसोटी मालिकेआधी होत असलेल्या सराव सामन्यांमध्ये सिराज आणि सैनीने त्यांच्या तेज माऱ्याने प्रभावित केले असून या दोघांना एखाद सामन्यात संधी मिळाल्यास नवल नाही.

  • अश्विन, जाडेजा की कुलदीप?

रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा प्रमुख फिरकीपटू मानला जातो. परदेशात मात्र अश्विनला तितकेसे यश मिळवता आलेले नाही. ऑस्ट्रेलियात त्याने ७ सामन्यांत २७ विकेट घेतल्या असून मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतीमुळे तो केवळ एक कसोटी खेळू शकला होता. मात्र, डावखुरा अष्टपैलू रविंद्र जाडेजा कन्कशनच्या नियमानुसार पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता असल्याचा अश्विनला फायदा होऊ शकेल. पहिल्या कसोटीत फिरकीपटूच्या स्थानासाठी अश्विन आणि कुलदीप यादव यांच्यात स्पर्धा आहे. कुलदीपला मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी येथे कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती आणि या संधीचे सोने करत त्याने पहिल्या डावात ५ मोहरे टिपले होते. त्यामुळे कुलदीप पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सराव सामन्यात कुलदीपला एकही विकेट मिळवता आली नव्हती आणि ही गोष्ट ऑफस्पिनर अश्विनच्या पथ्यावर पडू शकेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -