घरक्रीडाटोकियो ऑलिम्पिक झाल्यास भारताला भाग घ्यावाच लागेल!

टोकियो ऑलिम्पिक झाल्यास भारताला भाग घ्यावाच लागेल!

Subscribe

आयओएच्या पदाधिकार्‍याचे मत

करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जगभरात करोनाचे २ लाख १८ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. करोनाचा परिणाम खेळांवरही झाल्याचे पाहायला मिळत आहे. जगभरातील जवळपास सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परंतु, यावर्षी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा वेळापत्रकानुसार म्हणजेच २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत घेण्याचा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) आणि आयोजकांचा मानस आहे. टोकियो ऑलिम्पिक जर ठरल्याप्रमाणे झाले, तर भारताला या स्पर्धेत भाग घ्यावाच लागेल, असे मत भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) एका पदाधिकार्‍याने व्यक्त केले.

करोनाचा धोका संपूर्ण जगाला आहे, पण पुढील एक-दोन महिन्यांत यावर नियंत्रण मिळवण्यात यश येईल अशी आम्हाला आशा आहे. चीनमधून हा विषाणू जगभरात पसरला. मात्र, आता त्यांच्याकडे करोनाचे रुग्ण खूपच कमी झाले आहेत. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक कोणत्याही अडचणीशिवाय वेळापत्रकानुसारच होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मात्र, आयओसी ही प्रमुख संघटना आहे आणि ते जे ठरवतील, त्याचप्रमाणे आम्हाला वागावे लागेल. ऑलिम्पिक होणारच असे आयओसीकडून सांगण्यात आले, तर आपल्याला कोणत्याही धोक्याचा विचार न करता या स्पर्धेत भाग घ्यावाच लागेल, असे आयओएचा पदाधिकारी म्हणाला.

- Advertisement -

ऑलिम्पिक ठरल्याप्रमाणे घेऊन आयओसी आमच्या जीवाशी खेळ करत अशी टीका बर्‍याच खेळाडूंनी केली आहे. करोनामुळे खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी तयारी करताना बरेच अडथळे येत आहे. भारताच्या काही खेळाडूंना परदेशातून पुन्हा मायदेशी बोलवण्यात आले आहे. मात्र, असे असतानाही आयओएला भारतीय खेळाडूंकडून डबल डिजिट पदकांची अपेक्षा आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑलिम्पिकची तयारी करणे सोपे नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा, चाचणी स्पर्धा आणि सराव शिबिरे रद्द करण्यात आली आहेत. मात्र, याचा परिणाम केवळ भारताच्याच खेळाडूंवर नाही, तर सर्वच देशाच्या खेळाडूंवर होत आहे. त्यामुळे टोकियोमध्ये आम्हाला खेळाडूंकडून १० पेक्षा जास्त पदकांची अपेक्षा आहे.

खेळाडूंच्या सरावावर नजर!
आम्ही खेळाडूंच्या सरावावर, तसेच त्यांच्या आरोग्यावर नजर ठेवून आहोत. सध्याच्या अवघड परिस्थितीमध्ये आम्ही भारत सरकार, टोकियो ऑलिम्पिकचे आयोजक आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) यांच्याबरोबर मिळून काम करत आहोत, असेही भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) पदाधिकार्‍याकडून सांगण्यात आले. भारतामध्ये आतापर्यंत १६० हून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. या परिस्थितीत खेळाडूंना ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा मिळत नसल्याची आयओएला कल्पना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -