घरक्रीडाविश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळावा !

विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळावा !

Subscribe

काश्मीरमधील पुलवामामध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर भारताने इंग्लंडमध्ये मे महिन्यात सुरू होणार्‍या विश्वचषकात पाकिस्तानशी सामना खेळू नये अशी मागणी होत आहे. मागणी करणार्‍यांमध्ये हरभजन सिंगचाही समावेश आहे. मात्र, भारताने जर पाकिस्तानविरुद्धचा विश्वचषकातील सामना खेळला नाही, तर यात नुकसान भारताचेच आहे. त्यामुळे भारताने हा सामना खेळावा, असे मत भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

जर भारताने विश्वचषकात पाकिस्तानशी सामना न खेळण्याचा निर्णय घेतला, तर यात जिंकणार कोण आणि मी उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीविषयीही बोलत नाही. कोण जिंकणार ? पाकिस्तान जिंकणार, कारण त्यांना सामना न खेळताच २ गुण मिळतील. भारताने आतापर्यंत विश्वचषकात जेव्हाही पाकिस्तानचा सामना केला आहे, तेव्हा त्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आपण (भारत) त्यांच्याशी न खेळून त्यांना उगाचच २ गुण बहाल करू. त्यापेक्षा त्यांचा पराभव करून आपण त्यांना स्पर्धेबाहेर काढू शकतो, असे गावस्कर म्हणाले. असे असले तरी भारतीय सरकारने जर पाकिस्तानसोबत न खेळण्याचा निर्णय घेतला तरी आपण या निर्णयाला समर्थन देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

भारत आणि पाकिस्तान आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांसोबत खेळत असले तरी या दोन देशांत २०१३ नंतर द्विपक्षीय मालिका झालेली नाही. याबाबदल गावस्कर म्हणाले, पाकिस्तानचे नुकसान केव्हा होते, जेव्हा भारत त्यांच्यासोबत द्विपक्षीय मालिका खेळत नाही. मोठ्या स्पर्धांमध्ये भारताबरोबर सामना झाला नाही म्हणून पाकिस्तानचे नुकसान होत नाही. सध्या सर्वच लोक भावुक झाले आहेत याची मला कल्पना आहे, पण या गोष्टीचा शांतपणे विचार करणे गरजेचे आहे. सध्याचा भारतीय संघ इतका मजबूत आहे की पाकिस्तानसोबत न खेळताही तो विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश करेल, पण पाकिस्तानविरुद्ध खेळून, त्यांचा पराभव करून ते बाद फेरीत पोहोचणार नाहीत हे निश्चित करणे जास्त योग्य ठरेल, असे गावस्कर म्हणाले.

तसेच आयसीसीची २७ फेब्रुवारीपासून बैठक होणार आहे. या बैठकीत बीसीसीआय पाकिस्तानला या विश्वचषकात खेळू न द्यावे, अशी मागणी आयसीसीकडे करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, बीसीसीआयची ही मागणी पूर्ण होईल, असे गावस्करांना वाटत नाही. ते म्हणाले, बीसीसीआयने प्रयत्न करावा, पण त्यात त्यांना यश मिळेल असे मला वाटत नाही. कारण इतर सदस्य देशांनी या गोष्टीला मंजुरी दिली पाहिजे आणि तसे होताना मला दिसत नाही.

- Advertisement -

पाकिस्तानने पहिले पाऊल टाकावे

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारावेत अशी अपेक्षा असेल तर पाकिस्तानने पहिले पाऊल टाकावे, असा सल्ला सुनील गावस्करांनी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना दिला आहे. ज्याचे मला खूप कौतुक आहे आणि ज्याला मी मित्र मानतो त्या इम्रानलाच मी थेट सांगीन की, जेव्हा तू पंतप्रधान झालास, त्यावेळी तू म्हणाला होतास की आता नव्या पाकिस्तानचा उदय होईल. तू म्हणाला होतास की भारत एक पाऊल पुढे आले तर पाकिस्तान दोन पाऊले पुढे येईल, पण आता एक राजकारणी म्हणून नाही तर एक खेळाडू म्हणून मी तुला सांगू इच्छितो की पहिले पाऊल पाकिस्तानने टाकायची गरज आहे, असे गावस्कर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -