घरक्रीडानिर्भेळ यशाचे ध्येय!

निर्भेळ यशाचे ध्येय!

Subscribe

भारत-दक्षिण आफ्रिका तिसरी कसोटी आजपासून

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसर्‍या कसोटी सामन्याला शनिवारपासून रांची येथे सुरुवात होणार आहे. भारताने विशाखापट्टणम आणि पुणे येथे झालेले पहिले दोन सामने जिंकत तीन सामन्यांची ही मालिका आधीच खिशात घातली आहे. मात्र, या मालिकेतील निकाल जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ग्राह्य धरले जाणार असल्याने विराट कोहलीचा भारतीय संघ हा सामना जिंकत आणखी ४० गुण आपल्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न करेल. तसेच भारत हा सामना जिंकत मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचेही ध्येय घेऊन मैदानात उतरेल.

भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये दक्षिण आफ्रिकेपेक्षा सरस कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांनी या मालिकेतील पहिला सामना २०३ धावांनी, तर दुसरा सामना १ डाव आणि १३७ धावांनी जिंकत विजयी आघाडी मिळवली. या मालिकेआधी झालेल्या विंडीज दौर्‍यातही भारताने दोन कसोटी सामने जिंकले होते. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ४ पैकी ४ सामने जिंकणार्‍या भारताचे २०० गुण झाले आहेत. मात्र, आम्हाला या स्पर्धेत जास्तीजास्त गुण मिळवायचे असून आमचे दक्षिण आफ्रिकेला ’व्हाईटवॉश’ देण्याचे लक्ष्य आहे हे कर्णधार कोहलीने दुसर्‍या कसोटीनंतर स्पष्ट केले होते. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यातही सर्वोत्तम खेळ करताना दिसेल.

- Advertisement -

भारताची नवी सलामीची जोडी रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी या मालिकेत दमदार प्रदर्शन केले आहे. रोहितने पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत शतके केली होती. पहिल्या कसोटीत द्विशतक झळकावणार्‍या मयांकने दुसर्‍या कसोटीतही शतकी खेळी केली. तिसर्‍या क्रमांकावरील चेतेश्वर पुजाराने या मालिकेत सलग दोन अर्धशतके लगावली आहेत. कर्णधार कोहलीने पुण्यात झालेल्या दुसर्‍या कसोटीत कारकिर्दीतील सर्वोत्तम नाबाद २५४ धावांची खेळी केली. त्याला अजिंक्य रहाणेने चांगली साथ दिली. त्यामुळे तिसर्‍या कसोटीत फलंदाजांच्या फळीत बदल होण्याची शक्यता कमी आहे. दुसर्‍या कसोटीत वेगवान गोलंदाज उमेश यादवने यावर्षीचा पहिला सामना खेळताना ६ विकेट्स पटकावल्या होत्या. मात्र, रांची येथील खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल असण्याची शक्यता असल्याने अश्विन आणि जाडेजासह तिसरा फिरकीपटू म्हणून चायनामन कुलदीप यादवला संधी मिळू शकेल.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला हा सामना सुरू होण्याआधीच दोन धक्के बसले. सलामीवीर एडन मार्करम आणि फिरकीपटू केशव महाराज दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. मार्करमच्या जागी युवा फलंदाज झुबैर हमजा आणि महाराजच्या जागी जॉर्ज लिंडे यांना पदार्पणाची संधी मिळू शकेल. तसेच वेगवान गोलंदाज व्हर्नोन फिलँडर, कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्खिया यांनाही अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे लुंगी इंगिडीला संघात स्थान मिळू शकेल. या सामन्यात भारताला झुंज द्यायची असल्यास दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार फॅफ डू प्लेसिस, क्विंटन डी कॉक, टेंबा बवूमा, डीन एल्गर या अनुभवी खेळाडूंना जबाबदारीने खेळावे लागणार आहे.

- Advertisement -

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, रिषभ पंत, हनुमा विहारी, कुलदीप यादव, शुभमन गिल, उमेश यादव.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), टेंबा बवूमा, थानीस डी ब्रून, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डीन एल्गर, झुबैर हमजा, सेनूरन मुथुसामी, लुंगी इंगिडी, एन्रिच नॉर्खिया, व्हर्नोन फिलँडर, डेन पीड, कागिसो रबाडा, हेन्रिक क्लासन.

सामन्याची वेळ – सकाळी ९.३० पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -