घरक्रीडाIND vs AUS : भारताचे लक्ष्य मालिका विजयाचे; दुसरा टी-२० सामना आज

IND vs AUS : भारताचे लक्ष्य मालिका विजयाचे; दुसरा टी-२० सामना आज

Subscribe

आज सिडनीत होणारा दुसरा टी-२० सामना जिंकत ही मालिका जिंकण्याचे भारताचे लक्ष्य असेल.

आयसीसीच्या ‘कन्कशन सब्स्टीट्युट’च्या नियमाची सध्या बरीच चर्चा होत आहे. फलंदाजी करताना रविंद्र जाडेजाच्या हेल्मेटला चेंडू लागला आणि कन्कशनच्या नियमानुसार जाडेजाच्या जागी युजवेंद्र चहलला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. चहलने या संधीचे सोने करत तीन विकेट घेतल्या. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-२० सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे रविवारी (आज) सिडनीत होणारा दुसरा टी-२० सामना जिंकत ही मालिका जिंकण्याचे भारताचे लक्ष्य असेल.

विराट कोहलीच्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्याची चांगली सुरुवात करता आली नव्हती. सिडनी येथे झालेले सुरुवातीचे दोन एकदिवसीय सामने गमावल्याने त्यांना ही मालिकाही गमवावी लागली. मात्र, त्यानंतर भारतीय संघाने त्यांचा खेळ उंचावत कॅनबेरा येथे झालेला अखेरचा एकदिवसीय सामना, तसेच पहिला टी-२० सामना जिंकला. त्यामुळे आता भारताला टी-२० मालिका जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे. मात्र, अखेरच्या दोन टी-२० सामन्यांत भारताला जाडेजाविनाच खेळावे लागणार आहे. कन्कशनमुळे जाडेजाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

जाडेजाने पहिल्या टी-२० सामन्यात २३ चेंडूत नाबाद ४४ धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे भारताला त्याची उणीव नक्कीच भासेल. अष्टपैलू जाडेजाच्या अनुपस्थितीत आघाडीच्या फळीतील फलंदाजांना त्यांचा खेळ अधिक उंचावावा लागेल असे कर्णधार कोहलीचे म्हणणे आहे. त्यामुळे कोहलीसह लोकेश राहुल, शिखर धवन, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन हे फलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

फिंच सामन्याला मुकणार?

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच पूर्णपणे फिट नसल्याने दुसऱ्या टी-२० सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. फिंचला पहिल्या टी-२० सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. ‘मी दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, हे सांगणे अवघड आहे,’ असे पहिल्या सामन्यानंतर फिंच म्हणाला होता. तो या सामन्यात खेळू न शकल्यास स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड किंवा ग्लेन मॅक्सवेल यांच्यापैकी एक ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करू शकेल.

- Advertisement -

सामन्याची वेळ : दुपारी १.४० पासून
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -