घरक्रीडाभारत ‘अ’ संघाचा विजयी चौकार; ऋतुराज ९९

भारत ‘अ’ संघाचा विजयी चौकार; ऋतुराज ९९

Subscribe

ऋतुराज गायकवाडच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने पाचव्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा ८ विकेट्स आणि १०२ चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे भारत ‘अ’ संघाने पाच सामन्यांची ही एकदिवसीय मालिका ४-१ अशी जिंकली. ऋतुराजला शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. या मालिकेच्या चार सामन्यांतील ऋतुराज आणि अय्यरचे दुसरे अर्धशतक होते.

अँटिग्वामधील कुलेज ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा कर्णधार रॉस्टन चेसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुनील अँब्रिस आणि कजॉर्न ओटली या सलामीवीरांनी वेस्ट इंडिज ‘अ’ संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी १३.३ षटकांत ७७ धावांची भागीदारी केली. मात्र, ओटलीला वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने शुभमन गिलकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. विश्वचषकात काही सामने खेळलेल्या अँब्रिसने आक्रमक फलंदाजी करत ५२ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केल्यावर त्याला ऋतुराजने धावचीत केले. यानंतर मधल्या फळीतील डेवेन थॉमस (१), चेस (१), जॉनाथन कार्टर (९), रोवमन पॉवेल (९) आणि रखीम कॉर्नवेल (१०) हे फलंदाज झटपट माघारी परतले.

- Advertisement -

वेस्ट इंडिज ‘अ’ संघाने ३८ धावांत ५ विकेट्स गमावल्यामुळे त्यांची २ बाद ८६ वरून ७ बाद १२४ अशी अवस्था झाली. डावखुर्‍या शर्फेन रुदरफोर्डने एक बाजू लावून धरत ७० चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६५ धावांची खेळी केली. त्याला खेरी पिएरने नाबाद ३५ धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी नवव्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केल्यावर रुदरफोर्डला दीपक चहरने माघारी पाठवले. दीपकनेच अकिम जॉर्डनचा ६ धावांवर त्रिफळा उडवल्याने विंडीज ‘अ’ संघाचा डाव ४७ व्या षटकात २३६ धावांवर संपुष्टात आला. भारत ‘अ’ कडून दीपक चहर, राहुल चहर आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

२३७ धावांचा पाठलाग करताना भारत ‘अ’ ची उत्कृष्ट सुरुवात झाली. महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या ११.४ षटकांतच ११० धावा जोडल्या. गिलने ४० चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. त्याला ऑफस्पिनर कॉर्नवेलने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ऋतुराजने चांगली फलंदाजी सुरू ठेवत अय्यरसोबत दुसर्‍या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली. मात्र, ऋतुराजचे शतक एका धावेने हुकले. त्याने ८९ चेंडूत ११ चौकर आणि ३ षटकारांसह ९९ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर अय्यर आणि कर्णधार मनीष पांडे यांनी उर्वरित धावा करत भारत ‘अ’ संघाला ३३ षटकांत विजय मिळवून दिला. अय्यरने नाबाद ६१ धावा केल्या. या मालिकेतील, तसेच स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अय्यर आणि पांडे यांचे विंडीज दौर्‍यासाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –

वेस्ट इंडिज ‘अ’ : ४७.४ षटकांत सर्वबाद २३६ (शर्फेन रुदरफोर्ड ६५, सुनील अँब्रिस ६१, खेरी पिएरने नाबाद ३५; नवदीप सैनी २/३१, दीपक चहर २/३९, राहुल चहर २/५३) पराभूत वि. भारत ‘अ’ : ३३ षटकांत २ बाद २३७ (ऋतुराज गायकवाड ९९, शुभमन गिल ६९, श्रेयस अय्यर नाबाद ६१; किमो पॉल १/३७).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -