घरक्रीडाIND vs AUS : वर्षाचा 'अजिंक्य' समारोप; दुसऱ्या कसोटीतील विजयासह भारताची मालिकेत बरोबरी

IND vs AUS : वर्षाचा ‘अजिंक्य’ समारोप; दुसऱ्या कसोटीतील विजयासह भारताची मालिकेत बरोबरी

Subscribe

भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ८ विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेला बॉक्सिंग-डे कसोटी सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ७० धावांचे आव्हान ठेवले. कसोटीत पदार्पण करणारा शुभमन गिल (नाबाद ३५) आणि कर्णधार रहाणे (नाबाद २७) यांनी चांगली फलंदाजी करत भारताला १६ व्या षटकात विजय मिळवून दिला.

‘भारतीय संघाचा अप्रतिम खेळ. घायाळ वाघाला कधीही कमी लेखू नका,’ अशा शब्दांत दिनेश कार्तिकने भारताच्या विजयाचे वर्णन केले. अ‍ॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत गारद झाला होता. त्यातच कर्णधार विराट कोहली, मोहम्मद शमी, रोहित शर्मा यांसारखे प्रमुख खेळाडू दुसऱ्या कसोटीत खेळू शकले नाहीत. मात्र, या सर्व आव्हानांवर मात करत रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत उत्कृष्ट विजयाची नोंद केली.

- Advertisement -

तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात ६ बाद १३३ अशी धावसंख्या होती आणि त्यांच्याकडे केवळ दोन धावांची आघाडी होती. चौथ्या दिवसाच्या सुरूवातीला कॅमरुन ग्रीन (४५) आणि पॅट कमिन्स (२२) यांनी काही काळ चांगली फलंदाजी केली. मात्र, जसप्रीत बुमराहने कमिन्सला बाद केले, तर मोहम्मद सिराजने ग्रीन आणि नेथन लायनला माघारी पाठवले. अखेर अश्विनच्या गोलंदाजीवर जॉश हेझलवूड त्रिफळाचित झाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव २०० धावांवर संपुष्टात आला. भारताला सामना जिंकण्यासाठी ७० धावांचे आव्हान मिळाले, जे त्यांनी आठ विकेट राखून पूर्ण करत मालिकेत बरोबरी केली.

संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया : १९५ आणि २०० (ग्रीन ४५, वेड ४०; सिराज ३/३७, जाडेजा २/२८) पराभूत वि. भारत : ३२६ आणि २ बाद ७० (गिल नाबाद ३५, रहाणे नाबाद २७).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -