घरक्रीडाकसोटी फलंदाजांची! ,भारत-विंडीज पहिला सामना आजपासून

कसोटी फलंदाजांची! ,भारत-विंडीज पहिला सामना आजपासून

Subscribe

टी-२० आणि एकदिवसीय मालिकेपाठोपाठ भारतीय संघाचे वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिकेही जिंकण्याचे लक्ष्य असेल. या मालिकेतील पहिला गुरुवारपासून सर व्हिव्ह रिचर्ड्स स्टेडियम येथे होणार आहे. दोन्ही संघांचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील हा पहिलाचा सामना असणार आहे. दोन्ही संघ या स्पर्धेची विजयी सुरुवात करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील.

विंडीजच्या संघाने मागील काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटपेक्षा चांगले प्रदर्शन केले आहे. त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडचा पराभव केला होता. त्यांच्या या कामगिरीत कर्णधार जेसन होल्डर, किमार रोच आणि शॅनन गेब्रियल या वेगवान गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय फलंदाजांना धावा करण्यासाठी झुंजावे लागू शकेल.

- Advertisement -

या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. कर्णधार विराट कोहलीसह चेतेश्वर पुजारा, सलामीवीर मयांक अगरवाल आणि यष्टीरक्षक रिषभ पंत या सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र, दुसरा सलामीवीर लोकेश राहुल की हनुमा विहारी, तसेच मधल्या फळीत अजिंक्य रहाणे त्याचे स्थान कायम राखणार की विहारी किंवा रोहित शर्मा त्याची जागा घेणार हे प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आहेत. या सामन्याआधी झालेल्या सराव सामन्यात रहाणे, विहारी आणि रोहित या तिघांनीही अर्धशतके केली. रहाणेला मागील दोन वर्षांहूनही जास्त काळ कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात अपयश आले आहे. तर रोहित आणि राहुल यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन केलेले नाही. त्यामुळे विहारीला या संघात स्थान मिळणार अशी चिन्हे आहेत.

गोलंदाजांमध्ये भारतीय संघ जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या तेज त्रिकुटासह मैदानात उतरेल. मात्र, रविचंद्रन अश्विन, जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्यापैकी एक किंवा भारताने ५ गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला, तर दोन फिरकीपटूंना संधी मिळेल.

- Advertisement -

वेस्ट इंडिजच्या फलंदाजीची भिस्त रॉस्टन चेस, क्रेग ब्रेथवेट आणि डॅरेन ब्राव्हो यांच्यावर असेल. तसेच रहकीम कॉर्नवेलला या सामन्यात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. चांगला ऑफस्पिनर आणि उपयुक्त फलंदाज असणार्‍या कॉर्नवेलच्या समावेशामुळे विंडीजचा संघ अधिक मजबूत होईल.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, उमेश यादव.

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, जॉन कॅम्पबेल, शाई होप, डॅरेन ब्राव्हो, रॉस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, शेन डॉवरीच (यष्टीरक्षक), रहकीम कॉर्नवेल, शॅनन गॅब्रियल, किमार रोच, किमो पॉल, शमार ब्रूक्स.

सामन्याची वेळ : रात्री ७ पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -