वर्षाचा शेवट गोड करण्याचे लक्ष्य!

भारत-विंडीज निर्णायक वनडे सामना आज

Mumbai

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना रविवारी कटक येथे होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात दमदार पुनरागमन केले. रविवारी होणारा तिसरा सामना हा भारताचा या वर्षातील अखेरचा सामना आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या संघाचे हा सामना जिंकत वर्षाचा शेवट गोड करण्याचे लक्ष्य असेल. तसेच विंडीजविरुद्ध सलग दहावी मालिका जिंकण्याचे ध्येय घेऊनही भारत मैदानात उतरेल.

भारताने विशाखापट्टणम येथे झालेला दुसरा एकदिवसीय सामना १०७ धावांनी जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात कर्णधार कोहलीचा (०) अपवाद वगळता इतर फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी शतके ठोकत भारताच्या डावाची दमदार सुरुवात केली. तर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत भारताला ३५० धावांचा टप्पा पार करुन दिला. त्यामुळे तिसर्‍या सामन्यात फलंदाजीत बदल होणार नाही हे जवळपास निश्चित आहे.

गोलंदाजीत चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने हॅटट्रिक पटकावण्याची किमया केली, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही ३ गडी बाद करत त्याला उत्तम साथ दिली. दीपक चहर तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्याच्या जागी दिल्लीकर नवदीप सैनीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकेल. दुसर्‍या सामन्यात भारताचे फलंदाज आणि गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले. मात्र, क्षेत्ररक्षणात पुन्हा भारताने बर्‍याच चुका केल्या. आम्ही सतत झेल सोडत आहोत. ही चिंतेची बाब आहे. आम्ही क्षेत्ररक्षणात सुधारणा करणे गरजेचे आहे, असे दुसर्‍या सामन्यानंतर कर्णधार कोहली म्हणाला.

दुसरीकडे विंडीजच्या गोलंदाजांनी दुसर्‍या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. तर शाई होप आणि निकोलस पूरन वगळता इतर फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. वेस्ट इंडिजला १३ वर्षांत भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. आता हा मालिका विजयाचा दुष्काळ संपवण्यासाठी तिसर्‍या सामन्यात विंडीजला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मयांक अगरवाल, मनीष पांडे, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनिल अँब्रिस, शाई होप, खेरी पिएर, रॉस्टन चेस, अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, एविन लुईस, रोमॅरिओ शेपर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनिअर.