घरक्रीडाIND vs AUS : टीम इंडियाची 'अजिंक्य' सरशी; ब्रिस्बन कसोटीतील विजयासह मालिका खिशात

IND vs AUS : टीम इंडियाची ‘अजिंक्य’ सरशी; ब्रिस्बन कसोटीतील विजयासह मालिका खिशात

Subscribe

भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली.  

गॅबाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल असल्याने, तसेच तिथे चेंडू अधिक उसळी घेत असल्याने ऑस्ट्रेलियाला या मैदानावर पराभूत करणे जवळपास अशक्यच आहे, असा समज होता. मात्र, अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने अशक्य ‘शक्य’ करून दाखवले. गॅबावर ऑस्ट्रेलियन संघाला तब्बल ३२ वर्षांनंतर कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. रिषभ पंतची आक्रमक खेळी, तसेच वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर या युवा खेळाडूंच्या अष्टपैलू योगदानांमुळे भारताने हा कसोटी सामना ३ विकेट राखून जिंकला. या विजयासह भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकत बॉर्डर-गावस्कर करंडक सलग तिसऱ्यांदा आपल्याकडे राखला.

मालिका २-१ अशी खिशात

गॅबावर झालेला चौथा आणि निर्णायक कसोटी सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ३२८ धावांचे आव्हान ठेवले होते. युवा सलामीवीर शुभमन गिलने ९१ धावांची खेळी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. तो बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा (५६) आणि रिषभ पंत (नाबाद ८९) यांच्या महत्वपूर्ण खेळींमुळे भारताने ३२८ धावांचे लक्ष्य ३ विकेट राखून गाठले. गॅबाच्या मैदानावर कसोटी सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. या विजयासह भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी खिशात टाकत बॉर्डर-गावस्कर करंडक आपल्याकडे राखला.

- Advertisement -

भारतीय संघाला ५ कोटींचा बोनस

अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. त्यामुळे त्यांना बीसीसीआयने ५ कोटी रुपयांच्या बोनसची घोषणा केली. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. ‘फारच उत्कृष्ट विजय. ऑस्ट्रेलियात जाऊन अशाप्रकारे मालिका जिंकणे सोपे नाही. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हा विजय कायमच लक्षात राहील. बीसीसीआयच्या वतीने या संघाला ५ कोटींचा बोनस देण्यात येणार आहे. या संघातील प्रत्येक सदस्याचे अभिनंदन,’ असे गांगुलीने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -