घरक्रीडाकर्णधार रोहितची तुफानी खेळी; भारत विजयी

कर्णधार रोहितची तुफानी खेळी; भारत विजयी

Subscribe

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत बरोबरी

आपला १०० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्‍या कर्णधार रोहित शर्माने केलेल्या तुफानी अर्धशतकामुळे भारताने दुसर्‍या टी-२० सामन्यात बांगलादेशचा ८ विकेट्स आणि २६ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. आता या टी-२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी (१० नोव्हेंबर) होणार आहे. भारताकडून १०० टी-२० सामने खेळणारा रोहित हा पहिलाच खेळाडू आहे. त्याने या आपल्या विक्रमी सामन्यात अवघ्या ४३ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची खेळी केली.

दुसर्‍या टी-२० सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय भारताच्या गोलंदाजांना सुरुवातीला योग्य ठरवण्यात अपयश आले. बांगलादेशचे सलामीवीर लिटन दास आणि मोहम्मद नईम यांनी आक्रमक सुरुवात करत अवघ्या सहाव्या षटकातच ५० धावा फलकावर लावल्या. मात्र, आठव्या षटकात लिटनला २९ धावांवर रिषभ पंतने धावचीत केले. तर वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात नईम ३६ धावांवर बाद झाला. मागील सामन्यात अर्धशतकी खेळी करणार्‍या मुशफिकूर रहीमला या सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही. लेगस्पिनर युजवेंद्र चहलने त्याला ४ धावांवर माघारी पाठवले.

- Advertisement -

सौम्या सरकारने आक्रमक फलंदाजी करत २० चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३० धावा केल्या. परंतु, चहलच्या गोलंदाजीवर सरकारला रिषभ पंतने यष्टिचित केले. त्यामुळे बांगलादेशची बिनबाद ६० वरून ४ बाद १०३ अशी धावसंख्या झाली. कर्णधार मोहमदुल्लाहने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत २१ चेंडूत ३० धावा केल्या. मात्र, त्याला इतरांची साथ लाभली नाही. त्यामुळे बांगलादेशला २० षटकांत ६ बाद १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून युजवेंद्र चहलने २८ धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक २ विकेट्स मिळवल्या.

भारताच्या फलंदाजांना पहिल्या टी-२० सामन्यात चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले होते. परंतु, दुसर्‍या टी-२० सामन्यात त्यांनी आपल्या खेळात सुधारणा केली. १५४ धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित आणि शिखर धवन यांनी सुरुवातीपासूनच बांगलादेशच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. खासकरून रोहितने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या २३ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. त्याच्या आणि धवनच्या चांगल्या फलंदाजीमुळे दहा षटकांच्या आतच भारताच्या १०० धावा फलकावर लागल्या. अखेर धवनला ३१ धावांवर अमिनुल इस्लामने बाद करत ही जोडी फोडली.

- Advertisement -

धवन आणि रोहितने १०.५ षटकांत ११८ धावांची सलामी दिली. रोहितने मोसादेक हुसेनच्या एकाच षटकात सलग तीन षटकारही लगावले. तो शतक करणार असे वाटत असतानाच अमिनुलनेच त्याला ८५ धावांवर बाद केले. मात्र, श्रेयस अय्यर (१३ चेंडूत नाबाद २४) आणि लोकेश राहुल (११ चेंडूत नाबाद ८) यांनी उर्वरित धावा करत १६ व्या षटकातच भारताला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक – बांगलादेश : २० षटकांत ६ बाद १५३ (नईम ३६, सरकार ३०, मोहमदुल्लाह ३०; चहल २/२८, चहर १/२५, सुंदर १/२५) पराभूत वि. भारत : १५.४ षटकांत २ बाद १५४ (रोहित ८५, धवन ३१, श्रेयस नाबाद २४; अमिनुल २/२९).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -