घरक्रीडाभारतीय अ‍ॅथलेटिक्सला ’संजीवनी’

भारतीय अ‍ॅथलेटिक्सला ’संजीवनी’

Subscribe

नाशिकजवळचं ’वडाळीभोई’ हे गाव आजवर महाराष्ट्रातल्या लोकांनादेखील ठाऊक नसेल, परंतु २३ एप्रिलला दोहा येथे १०००० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या संजीवनी जाधवने कांस्यपदक पटकावून आपल्या गावाचं नाव एकदम जागतिक स्तरावर नेऊन ठेवलं! केनियाच्या रिफ्ट व्हॅलीत मध्यम आणि दीर्घ पल्ल्याच्या शर्यतींत धावणार्‍या अ‍ॅथलिट्सची खाण आहे म्हणे! आता भारतीय अ‍ॅथलेटिक्सप्रेमीदेखील म्हणतील, नाशिक तरी कुठे कमी आहे? नाशिकच्या व्हॅलीतदेखील मध्यम आणि दीर्घ पल्ल्याच्या शर्यतींत धावणार्‍या अ‍ॅथलिट्सची वानवा नाहीये! नाशिकच्या दुर्गम भागातून कविता राऊत (सावरपाडा), मोनिका अथरे, संजीवनी जाधव (वडाळीभोई) अशा एक-एक करून गुणी अ‍ॅथलिट्स प्रशिक्षक विजेंदरसिंग याना सापडू लागले आणि नाशिकचं नाव जागतिक क्षितिजावर उजळत गेलं!

भारतीय अ‍ॅथलेटिक्सविश्वात अनेक कहाण्या आहेत. गरिबीतून वर आलेले अ‍ॅथलिट्स आहेत. परंतु, अनेक कारणांमुळे त्यांची प्रगती तरी खुंटते किंवा गरिबीतून आर्थिक स्थैर्य मिळाल्यावर त्यांची प्रगती तरी थांबते! संजीवनीने कांस्यपदक पटकावल्यावर वरील गोष्टी आठवल्या. आता कसं आहे, आपलं मूल कसंही असलं तरी आईबापाला त्याचं कौतुकच असतं. जर का ते मूल संजीवनीसारखं गुणी, हुशार, कर्तबगार निघालं तर मग आई-बापाचा आनंद तो काय वर्णावा? संजीवनी जाधवची कहाणी ही कुस्तीकडून अ‍ॅथलेटिक्सकडे वळलेल्या गुणी,कर्तबगार आणि धडाडीच्या अ‍ॅथलिट ची कहाणी आहे. गुरु विजेंदरसिंग यांना संजीवनीच्या रूपाने आणखीन एक हिरा मिळाला आणि हिरा मुळातच अस्सल असल्याने त्याला पैलू पडायचं काम विजेंदरसिंग यांनी सहजपणे केलं.

- Advertisement -

आशियाई ज्युनियर स्पर्धा शर्यतीत २०१८ साली तैपेई इथे ३००० मीटरमध्ये कांस्यपदक पटकावून संजीवनीने गुरूचा आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरवला. २०१७ हे वर्ष संजीवनीला अगदी लाभदायक ठरलं. ३००० आणि १०००० मीटर्स धावण्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर,ज्युनियर गटात धावताना तिने रौप्यपदकं पटकावली. त्यानंतर भुवनेश्वर येथे आशियाई स्पर्धा शर्यतींत ५००० मीटर धावण्यात तिने कांस्यपदक कमावलं ही तिची मोठी कामगिरी ठरली. गेल्या वर्षी तर तिने क्रॉस कंट्री शर्यतीतदेखील कांस्य पटकावलं. २३ एप्रिलला दोहा येथे १०००० मीटर शर्यतीत धावताना संजीवनीने आजवरची सर्वोत्तम वेळ दिली. संजीवनी धावलेल्या १०००० मीटर शर्यतीचा धडाका इतका अफाट आणि अद्भुत होता की सातातल्या सहा जणींनी स्वतःची सर्वोत्तम वेळ किंवा त्या हंगामातली सर्वोत्तम वेळ नोंदवली! बहारीनची विजेती अ‍ॅथलीट मुळची इथिओपियन म्हणजे आफ्रिका खंडातील शिताये इशेतेने बहारदार किक मारून ३१ मिनिटे आणि १५.६२ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्ण जिंकलं. जपानी निया हितोमीने रौप्य तर संजीवनीने कांस्य जिंकलं.

माझ्यासाठी आणि नाशिकवासीयांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे काल शर्यत संपल्यावर संजीवनीशी व्हाट्सऍपवर गप्पा मारायची, साक्षात तिच्याकडूनच आजवरच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घ्यायची संधी मिळाली. शर्यतींबद्दल काय वाटतंय? या प्रश्नावर संजीवनी म्हणाली, ’खूप छान वाटतंय. खरं सांगायचं तर बहारिनच्या (मुळच्या इथिओपियन) अ‍ॅथलीटबरोबर धावले म्हणूनच उत्तम वेळ नोंदवली गेली!’ नाशिकवासीयांच्या अलोट प्रेमाबद्दल विचारलं असता संजीवनी म्हणाली, ’विशेष म्हणून एवढंच सांगेन की नाशिककरांची जी मला साथ असते,जो आशीर्वाद असतो तो माझ्यासाठी मोलाचा आहे. तो त्यांनी कायम ठेवावा ही एकच भावना आज आनंदाच्या क्षणी मनात आहे.’ तांत्रिकदृष्ट्या शर्यत कशी धावलीस? संजीवनी म्हणाली, ’मी आघाडीच्या चमूबरोबरच धावत होते. त्यानंतर मध्ये ताकद कमी पडल्यासारखी वाटत होती. जर मी त्यावेळी चमूला सोडलं नसतं तर आणखीन चांगली कामगिरी झाली असती.’ त्यानंतर अर्थातच संजीवनीच प्रशिक्षक विजेंदरसिंग यांच्याशी फोनवर प्रदीर्घ बोलणं झालं. विजेंदरसिंग म्हणाले,’या क्षणी मी खूप आनंदात आहे.

- Advertisement -

कविता राऊत, मोनिका अथरे आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिट्ससारखीच संजीवनीही फार गुणी अ‍ॅथलीट आहे. माझ्या मते ती ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठीच जन्माला आलेली आहे! अवघ्या २३ वर्षांची संजीवनी आणखीन ५-६ वर्षांत, साधारण वयाच्या २९व्या वर्षी, कारकिर्दीच्या अतिउंच टप्प्यावर असेल! खुशीत असलेले विजेंदरसिंग पुढे म्हणाले की, ’तुम्हालाच काय, मलादेखील बघायचं आहे, ती कुठवर जाते, कुठवर प्रगती करते ते!’यानंतर मी संजीवनीला तुझ्या जीवनातील संघर्षाविषयीच्या काळाविषयी सांग असे म्हटल्यावर संजीवनी म्हणाली, ’मी पाचवीत असल्यापासून धावते आहे. दहावीत असेपर्यंत वडिलांनीच माझी धावण्याची तयारी करून घेतली.

माझे वडील शाळेत शिक्षक असले तरी त्यांना कुस्ती आवडायची. त्यामुळे सुरुवातीला मी थोडीफार कुस्तीदेखील खेळले. परंतु, धावण्यात मात्र त्यांनी प्रोत्साहन दिल्यानेच मी इथवर मजल मारू शकले. आमच्या घरात आईसुद्धा धावायला प्रोत्साहन द्यायची. भाऊ तर मोठा आधारस्तंभच आहे माझ्यासाठी, अगदी आजही! त्यामुळे मी आज ठामपणे म्हणू शकते की, आज मी जी कुणी आहे ती माझ्या कुटुंबियांमुळेच आहे.’ संजीवनी म्हणाली,’लहानपणी माझे वडील मला सायकलीवरून सोबत करीत असत आणि मी अनवाणी पळत असे. मी गावाकडची असल्याने आणि त्यातही मुलगी असल्याने लोक वडिलांना काहीबाही बोलत! मुलीला बघावं तेंव्हा पळवीत असता ती अशी पळून काय होणार?’ संजीवनी म्हणाली,’गावात पळत असल्याने मला पूर्ण कपड्यात पळायला लागायचं. परंतु वडिलांचं एक होतं. सकाळ-संध्याकाळ पळताना मला सोबत केल्यानंतर मी अभ्यासात पाठी नाही ना?हे देखील ते पाहायचे. माझा अभ्यास करूनघ्यायचे. त्यांच्या शिकवणुकीमुळे मी वर्गात पहिल्या तीन नंबरात असायची. एवढ्या गदारोळात दहावीपर्यंत मी दोनदा राष्ट्रीय पातळीवर धावले. आणि दहावीची परीक्षा पास झाल्यावर सिंगसरांकडे आले आणि त्यापुढेच मी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरीळ शर्यतीत धावू लागले.’संजीवनीची कहाणी ऐकून संजिवनीबद्दल कौतुक वाटलं. तिला म्हटलं, तू खुप मोठी अ‍ॅथलीट व्हावीस हीच सदिच्छा.

– उदय ठाकूरदेसाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -