IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया घालणार ‘रेट्रो’ जर्सी 

भारताचा संघ गुरुवारी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली 

युएईमध्ये झालेली आयपीएल स्पर्धा संपली असून आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे ते भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याकडे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताचा संघ गुरुवारी ऑस्ट्रेलियात दाखल झाला असून १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिकेपासून या दौऱ्याला प्रारंभ होईल. एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने २७ आणि २९ नोव्हेंबरला सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहेत. तर तिसरा एकदिवसीय सामना कॅनबेरा येथे होईल. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका होईल. एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत भारतीय संघ ‘रेट्रो’ जर्सी परिधान करण्याची दाट शक्यता आहे.

अशी असू शकेल जर्सी

विराट कोहलीचा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत ७० च्या दशकातील जर्सीकडून प्रेरणा घेऊन तयार केलेली जर्सी परिधान करणार असल्याची चर्चा आहे. भारतीय संघ गेल्या बऱ्याच वर्षांपासून निळ्या रंगाची जर्सी घालत आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धची जर्सी ही गडद निळ्या रंगाची असू शकेल. ही जर्सी एमपीएल ही कंपनी बनवणार आहे. मागील काही वर्षे भारतीय संघाची जर्सी बनवण्याचे काम ‘नायकी’ ही प्रसिद्ध कंपनी करत होती. मात्र, आता बीसीसीआयने ही जबाबदारी एमपीएलवर टाकली आहे. बीसीसीआयने एमपीएलसोबत तीन वर्षांचा करार केला आहे.