घरक्रीडासंधी हुकलीच!

संधी हुकलीच!

Subscribe

महान रणजीपटू राजिंदर गोयल यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. डावखुरे फिरकीपटू असणारे गोयल हे रणजी करंडकात सर्वाधिक विकेट मिळवणारे गोलंदाज होते. दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या संघांचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी १५७ प्रथम श्रेणी सामन्यांत ७५० गडी बाद केले. यापैकी ६३७ विकेट या त्यांनी रणजीमध्ये घेतल्या. मात्र, इतक्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही त्यांना भारताकडून खेळण्याची कधीही संधी मिळाली नाही. गोयल यांच्याप्रमाणेच आणखी काही खेळाडू होते, ज्यांची स्थानिक क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतरही भारतीय संघात निवड झाली नाही. अशाच काही खेळाडूंवर टाकलेली ही एक नजर... 

भारत म्हणजे फलंदाज आणि फिरकीपटू घडवण्याची जणू खाणच! टायगर पतौडी, विजय मर्चंट, विनू मंकड, गुंडप्पा विश्वनाथ, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, लक्ष्मण, विराट कोहली यांसारखे एकापेक्षा एक उत्कृष्ट फलंदाज भारताला लाभले. तर सुभाष गुप्ते, प्रसन्ना, चंद्रशेखर, बिशन सिंग बेदी, वेंकटराघवन, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, अश्विन यांनी वेगवेगळ्या दशकांमध्ये भारतीय संघाच्या फिरकीची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली. मात्र, दुर्दैवाने भारतीय क्रिकेटमध्ये असेही काही खेळाडू होऊन गेले ज्यांना स्थानिक क्रिकेटमध्ये दर्जेदार कामगिरी केल्यानंतरही राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालीच नाही.

या खेळाडूंमध्ये अग्रस्थानी नाव येते ते मुंबईचे डावखुरे फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांचे. १९६२ मध्ये पदार्पण करणाऱ्या शिवलकर यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १२४ सामन्यांत ५८९ मोहरे टिपले. विशेष म्हणजे त्यांची सरासरी होती केवळ १९.६९ ची! ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर शेन वॉर्न आणि श्रीलंकेचा ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन हे क्रिकेटच्या इतिहासातील दोन सर्वोत्कृष्ट फिरकीपटू मानले जातात. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वॉर्नने २६.११, तर मुरलीधरनने १९.७४ च्या सरासरीने विकेट घेतल्या. यावरुनच शिवलकर यांच्या महानतेची प्रचिती येते.

- Advertisement -

शिवलकर यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्षे १९६० ते ८० मध्ये आली. या काळात भारताकडे प्रसन्ना, चंद्रशेखर, बेदी आणि वेंकटराघवन ही फिरकी चौकडी होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासावर नजर टाकल्यास दोन डावखुरे फिरकीपटू फारसे एकत्र खेळत नाहीत असे निदर्शनास येते. त्यामुळे डावखुरे फिरकीपटू म्हणून त्या काळात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी तुमची थेट स्पर्धा होती ती बेदी यांच्यासोबत! ६७ कसोटीत २६६ गडी बाद करणाऱ्या बेदी यांना संघाबाहेर करणे फार मोठे आव्हान होते.

त्यामुळे राजिंदर गोयल यांच्याप्रमाणेच शिवलकर यांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधीची बरीच प्रतीक्षा करावी लागली. परंतु, त्यांना शेवटपर्यंत भारताच्या निळ्या कॅपने हुलकावणीच दिली. शिलवकर यांना या गोष्टीचे नक्कीच वाईट वाटले असेल. परंतु, याचा त्यांच्या खेळावर कधीही परिणाम झाला नाही. ‘जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो खो गया मै उसको भुलाता चला गया’, असे म्हणत ते मुंबईच्या यशात महत्त्वाचे योगदान देत राहिले.

- Advertisement -

शिवलकर यांच्याप्रमाणेच मुंबईचा आणखी एक क्रिकेटपटू होता, ज्याला स्थानिक क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतरही राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. तो खेळाडू म्हणजे अमोल मुझुमदार. फलंदाज अमोलने सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यासोबतच शारदाश्रम शाळेतून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. सचिन आणि कांबळीने हॅरिस शिल्डच्या सामन्यात ६६४ धावांची विक्रमी भागीदारी केली, त्यावेळी अमोल पुढील क्रमांकावर फलंदाजीला येणार होता. परंतु, त्याला संधी मिळालीच नाही.

१९९३/९४ च्या मोसमात अमोलने बॉम्बेकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि हरियाणाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात २६० धावांची अप्रतिम खेळी केली. ‘या मुलामध्ये काहीतरी खास आहे’ हे लोकांना कळून चुकले होते. पुढील वर्षीच इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली. पुढे जाऊन तो भारत ‘अ’ संघात सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्यासोबतही खेळला. गांगुली आणि द्रविड यांनी हळूहळू एक पाऊल पुढे जात १९९६ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

अमोलही लवकरच आपल्या दोन सहकाऱ्यांप्रमाणे पुढील पायरी गाठेल असे अनेकांना वाटत होते. परंतु, त्याच वेळी भारताला सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण हे ‘फॅब फोर’ लाभल्यामुळे आणखी एका फलंदाजाला आपला प्रभाव पाडणे अवघडच जाणार होते. हेच १७१ प्रथम श्रेणी सामन्यांत ४८.१३ च्या सरासरीने ११,१६७ धावा करणाऱ्या अमोलच्या बाबतीत घडले. जवळपास दोन दशके स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतरही त्याला राष्ट्रीय संघातून खेळायला मिळाले नाही.

भारत, तसेच मुंबई आणि विदर्भाचा माजी सलामीवीर वसिम जाफरने काही वर्षांपूर्वी रणजीमध्ये सर्वाधिक धावांचा अमोलचा विक्रम मोडला. अमोलच्या आधी हा विक्रम हरियाणा आणि पंजाबचे माजी फलंदाज अमरजित केपी यांच्या नावे होता. अमरजित यांनी रणजीमध्ये २७ शतकांच्या मदतीने ७६२३ धावा फटकावल्या. परंतु, त्यांनाही भारताची कॅप घालण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचे माजी फलंदाज मिलिंद गुंजाळ (प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४७.१९ च्या सरासरीने १४ शतकांसह ५४२७ धावा), सुरेंद्र भावे (प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५८.१८ च्या सरासरीने २८ शतकांसह ७९७१ धावा), तसेच दिल्लीचे माजी फलंदाज केपी भास्कर (प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५२.८४ च्या सरासरीने १८ शतकांसह ५४४३ धावा) यांनीही सातत्याने धावा करत भारतीय संघाचे दार ठोठावले, पण अखेरपर्यंत त्यांच्यासाठी ते उघडले नाही. परंतु, त्यामुळे या खेळाडूंचे नुकसान झाले की भारताचे, हाच खरा प्रश्नच आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -