बंगळुरूने केवळ कोहली, एबीवर अवलंबून राहता कामा नये – मोईन

आयपीएल स्पर्धा

Mumbai
moeen

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्रत्येक मोसमात जेतेपदाची अपेक्षा केली जाते. कर्णधार कोहलीव्यतिरिक्त या संघात एबी डिव्हिलियर्स, लेगस्पिनर युजवेंद्र चहल, वेगवान गोलंदाज उमेश यादव यांसारख्या ‘मॅचविनर’ खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, १२ मोसमानंतरही त्यांची जेतेपदाची पाटी कोरी आहे. मागील मोसमात बंगळुरूचा संघ अखेरच्या स्थानावर राहिला होता. त्यामुळे खेळाडू लिलावाआधी त्यांनी तब्बल १२ खेळाडूंना संघाबाहेर केले. त्यांनी एबी आणि इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली या दोनच परदेशी खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. बंगळुरूला पुढील मोसमात चांगली कामगिरी करायची असल्यास केवळ कोहली, एबीवर अवलंबून राहून चालणार नाही, असे मत मोईनने व्यक्त केले.

आम्ही मोसमाच्या सुरुवातीपासूनच सामने जिंकणे गरजेचे आहे. आम्ही प्रत्येक मोसमात सुरुवातीला चांगला खेळ करत नाही. आम्हाला खासकरून बंगळुरूमध्ये हुशारीने खेळावे लागेल. बंगळुरूची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी अनुकूल असते आणि सीमारेषा खूप जवळ आहे. त्यामुळे तिथे गोलंदाजी करणे आव्हानात्मक असते. आम्ही सामने जिंकण्यासाठी केवळ कोहली आणि एबीवर अवलंबून राहू शकत नाही. माझ्यासह इतर फलंदाजांनी आपल्या खेळात सुधारणा करत संघासाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे, असे मोईन म्हणाला.