घरक्रीडाIND vs AUS : रोहितसह टीम इंडिया सिडनीत नवा इतिहास रचण्यास सज्ज

IND vs AUS : रोहितसह टीम इंडिया सिडनीत नवा इतिहास रचण्यास सज्ज

Subscribe

या मालिकेतील तिसरी कसोटी गुरुवारपासून सुरु होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सध्या रंगतदार स्थितीत आहे. अ‍ॅडलेडला झालेल्या पहिल्या कसोटीत नीचांकासह पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत दमदार पुनरागमन केले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आता या मालिकेतील तिसरी कसोटी गुरुवारपासून सुरु होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणाऱ्या रोहित शर्माचे सिडनी कसोटीसाठी भारतीय संघात पुनरागमन होणार आहे.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारताच्या फलंदाजांनी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. मात्र, भारताने सिडनीमध्ये केवळ एक कसोटी जिंकली असून हा विजय तब्बल ४२ वर्षांपूर्वी आला होता. त्यामुळे गुरुवारपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी आहे. या सामन्यापूर्वी भारताचा सलामीवीर रोहितबाबत बरीच चर्चा सुरु होती. आयपीएल स्पर्धेत झालेल्या दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका, तसेच कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता. मात्र, तिसऱ्या कसोटीत त्याचे भारतीय संघात पुनरागमन होणार असून त्याला मयांक अगरवालच्या जागी संधी मिळणार आहे.

- Advertisement -

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक मानला जातो. मात्र, परदेशातील कसोटीत सलामीवीर म्हणून खेळण्याची ही रोहितची पहिलीच वेळ असणार आहे. त्याला सलामीला शुभमन गिलची साथ लाभेल. सिडनीची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे अश्विन आणि रविंद्र जाडेजा ही भारताची फिरकी जोडगोळी कशी कामगिरी करते हे पाहणेही महत्वाचे ठरेल.

सैनीला पदार्पणाची संधी

- Advertisement -

पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच तिसऱ्या कसोटीपूर्वी एक दिवस भारताने आपल्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली. उमेश यादवला दुसऱ्या कसोटीत दुखापत झाल्याने उर्वरित दोन सामन्यांतून माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे त्याच्या जागी नवदीप सैनी, नटराजन आणि शार्दूल ठाकूर यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर भारताने दिल्लीचा वेगवान गोलंदाज सैनीला संघात स्थान दिले. त्यामुळे सिडनीमध्ये सैनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करेल. सैनीने आतापर्यंत ४६ प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात १२८ विकेट घेतल्या आहेत. तो जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसोबत भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -