घरक्रीडाचक दे इंडिया- विश्वचषकासाठी महिला हॉकी संघ सज्ज

चक दे इंडिया- विश्वचषकासाठी महिला हॉकी संघ सज्ज

Subscribe

२०१८ महिला हॉकी विश्वचषकाचा थरार आजपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना आज यजमान इंग्लंडविरुद्ध होणार आहे. जागतिक क्रमवारीत भारत १० व्या तर इंग्लंड २ र्‍या स्थानी आहे. त्यामुळे या सामन्यात इंग्लंडचे पारडे जाड मानले जात आहे. असे असले तरी भारत यजमानांना पराभूत करून स्पर्धेत विजयी सलामी करण्याचा प्रयत्न करेल.

यावर्षीच्या स्पर्धेत नेहमीप्रमाणे नेदरलँड्स, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया या संघांना हा विश्वचषक जिंकण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. महिला हॉकी क्रमवारीत नेदरलँड्सचा संघ अव्वल, अर्जेंटिनाचा संघ तिसर्‍या तर ऑस्ट्रेलियन संघ पाचव्या स्थानावर आहे. नेदरलँड्सने मागील ५ महिला विश्वचषकांत किमान अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. तसेच ते विश्वचषकाचे गतविजेते असल्याने त्यांनाच ही स्पर्धा जिंकण्याचे प्रमुख दावेदार मानले जात आहे.

- Advertisement -

भारतीय महिला हॉकी संघ गेल्या काही काळापासून सातत्यपूर्ण प्रदर्शन करत आहेत. मात्र, भारतीय संघांना विश्वचषकात चांगले प्रदर्शन करण्यात फारसे यश आलेले नाही. १९७४ विश्वचषकात मिळालेले चौथे स्थान हे भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे यावर्षीच्या विश्वचषकात या खेळाडूंना भारतीय महिला हॉकीचा नवा इतिहास लिहिण्याची संधी आहे. मात्र, असे करणे भारताला सोपे असणार नाही. कारण, भारताच्या गटात यजमान इंग्लंड, अमेरिका आणि आयर्लंड हे संघ आहेत. जागतिक क्रमवारीत इंग्लंड २ र्‍या, अमेरिका ७ व्या तर आयर्लंड १६ व्या स्थानी आहेत. त्यामुळे पुढील फेरीत जाण्यासाठी भारताला उत्तम खेळ करण्याशिवाय पर्याय नाही.

- Advertisement -

भारताच्या संघाची धुरा कर्णधार रानी रामपालच्या खांद्यावर असणार आहे. तिने २००९ मध्ये वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने भारतासाठी १९३ सामन्यांत ९९ गोल केले आहेत. त्यामुळे या स्पर्धेतही गोल करण्यासाठी भारत तिच्यावर अवलंबून आहे. मात्र, रानीसोबतच वंदना कटारियासारख्या अनुभवी खेळाडूंकडूनही भारतीय संघाला खूप आशा आहेत.

या विश्वचषकात एकूण १६ संघांचा समावेश आहे. हे संघ चार गटांत विभागण्यात आले आहेत. गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल होईल. तर गटात चौथ्या स्थानी राहणार्‍या संघांचे आव्हान संपुष्टात येईल. मात्र, दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानी असलेल्या संघांना प्ले-ऑफमध्ये खेळावे लागेल. या प्ले-ऑफमधील विजयी संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -