घरक्रीडाभारतीय महिलांचा मालिका विजय!

भारतीय महिलांचा मालिका विजय!

Subscribe

तिसर्‍या वनडेत विंडीजवर ६ विकेट राखून मात

स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्सने केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय महिला संघाने तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर ६ विकेट्स राखून मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांची ही मालिका २-१ अशी जिंकली.

या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांनी पहिल्या ५ विकेट्स अवघ्या ८४ धावांत गमावल्या. मात्र, कर्णधार स्टेफनी टेलर आणि स्टेसी अ‍ॅन-किंगने मिळून विंडीजचा डाव सावरला. त्यांनी सहाव्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. टेलरला पूनम यादवने माघारी पाठवत ही जोडी फोडली. टेलरने ११२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७९ धावांची खेळी केली. पुढच्याच षटकात झुलन गोस्वामीने किंगचा त्रिफळा उडवला. किंगने ४५ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३८ धावा केल्या. यानंतरच्या फलंदाज फारशा धावा करू शकल्या नाहीत. त्यामुळे विंडीजचा डाव अखेरच्या षटकात १९४ धावांवर आटोपला.

- Advertisement -

१९५ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्स आणि स्मृती मानधनाने १४१ धावांची भागी करत भारताच्या डावाची अप्रतिम सुरुवात केली. जेमिमाने ६९ चेंडूत, तर मानधनाने अवघ्या ४९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, जेमिमाला ६९ धावांवर हेली मॅथ्यूजने बाद केले. जेमिमाने या धावा ९२ चेंडूत ६९ धावा केल्या. काही षटकांनंतर मॅथ्यूजनेच मानधनाला ७४ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मानधनाने या धावा ६३ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केल्या. पुढे पूनम राऊत आणि कर्णधार मिताली राजने ४० धावांची भागी केली. त्यामुळे भारताने १९५ धावांचे लक्ष्य ४३ व्या षटकात ६ विकेट राखून गाठले.

संक्षिप्त धावफलक – वेस्ट इंडिज : ५० षटकांत सर्वबाद १९४ (टेलर ७९, अ‍ॅन-किंग ३८; झुलन २/३०, पूनम यादव २/३५) पराभूत वि. भारत : ४२.१ षटकांत ४ बाद १९५ (मानधना ७४, जेमिमा ६९; मॅथ्यूज ३/२७).

- Advertisement -

मानधनाने टाकले कोहलीला मागे

भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने विंडीजविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ७४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पा पार केला. तिने या धावा ५१ डावांत पूर्ण केल्या. त्यामुळे तिने अनोखा विक्रम आपल्या नावे केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पा सर्वात जलद पार करणार्‍या भारतीयांमध्ये ती दुसर्‍या स्थानी पोहोचली आहे. पुरुष संघाच्या शिखर धवनने ४८ डावांमध्ये ही कामगिरी केली होती, तर कर्णधार विराट कोहलीने २००० धावा पूर्ण करण्यासाठी ५३ डाव घेतले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -