ईशांतच्या समावेशाने भारताची गोलंदाजी अधिक मजबूत

Mumbai
Ishant Sharma

ईशांत शर्माच्या समावेशाने भारताची गोलंदाजी अधिक मजबूत झाली असून त्यात विविधता आली आहे, असे मत न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने केले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. मागील महिन्यात रणजी सामन्यात खेळताना ईशांतच्या पायाला दुखापत झाली. मात्र, तो आता फिट झाला असून त्याचा या मालिकेसाठी भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

आम्ही केवळ जसप्रीत बुमराहबाबत विचार करु शकत नाही. भारताची गोलंदाजांची फळी अप्रतिम आहे. ईशांत या मालिकेत खेळणार नाही अशी शक्यता होती. परंतु, आता त्याच्या पुनरागमनाने भारताची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे, असे टेलर म्हणाला. तसेच त्याने पुढे सांगितले, त्यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाजही आहेत. भारताचा संघ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे आणि त्यांच्याविरुद्ध यश मिळवण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळच करावा लागेल.

भारताविरुद्धचा सामना हा टेलरचा कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असेल. याआधीच २३१ एकदिवसीय आणि १०० टी-२० सामने खेळणारा टेलर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सामन्यांचे शतक करणारा पहिला क्रिकेटपटू ठरणार आहे. सुरुवातीच्या काळात मला बर्‍याच आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र, त्यामुळे खेळाडू आणि माणूस म्हणून मी अधिक परिपक्व झालो. यश किंवा धावांपेक्षा, अपयश तुम्हाला माणूस म्हणून घडवते, असे टेलर म्हणाला.

ईशांतचा अनुभव फायदेशीर – कोहली

ईशांत शर्मा याआधी न्यूझीलंडमध्ये कसोटी खेळल्याने त्याचा अनुभव फायदेशीर ठरेल, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीला वाटते. ईशांत पायाची दुखापत होण्याआधी ज्याप्रकारे गोलंदाजी करत होता, त्याचप्रमाणे आताही करत आहे. तो योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत आहे. तो याआधी न्यूझीलंडमध्ये कसोटी खेळला आहे आणि त्याचा अनुभव आमच्यासाठी फायदेशीर ठरेल, असे कोहलीने नमूद केले.