भारताचे लक्ष्य मालिका विजयाचे!

 दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून

Mumbai

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये गुरुवारपासून भारत आणि पाहुण्या दक्षिण आफ्रिका या संघांमधील दुसर्‍या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. भारताने विशाखापट्टणम येथे झालेला पहिला कसोटी सामना २०३ धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेचा विजयी श्रीगणेशा केला. आता पहिल्या कसोटीतील दमदार कामगिरीची पुनरावृत्ती करत दुसर्‍या कसोटीसह मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ खेळात सुधारणा करून या मालिकेतील आपले आव्हान टिकवण्याचा प्रयत्न करेल.

जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असणार्‍या विराट कोहलीच्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत उत्कृष्ट खेळ केला. कसोटीत पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळणार्‍या रोहित शर्माने दोन्ही डावांमध्ये शतके लगावत संघ व्यवस्थापन आणि निवड समितीचा विश्वास सार्थकी लावला. त्याचा सलामीचा साथी मयांक अगरवालने पहिल्या डावात २१५ धावांची खेळी करताना रोहितसोबत ३१७ धावांची भागीदारी केली. विंडीजविरुद्धच्या मालिकेत धावांसाठी झुंजणार्‍या चेतेश्वर पुजाराने पहिल्या सामन्याच्या दुसर्‍या डावात ८१ धावांची खेळी करत पुन्हा फॉर्मात आल्याचे दाखवून दिले. या तिघांना दुसर्‍या सामन्यातही चांगली कामगिरी करण्यात यश आल्यास भारताला रोखणे दक्षिण आफ्रिकेला अवघड जाईल. तसेच कर्णधार कोहली, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी हेसुद्धा या सामन्यात मोठ्या धावा करण्याचा प्रयत्न करतील.

गहुंजे स्टेडियममध्ये होणारा हा दुसरा कसोटी सामना आहे. या स्टेडियममधील पहिला सामना २०१७ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर केवळ स्टिव्ह स्मिथला शतक करता आले. ऑस्ट्रेलियाची फिरकी जोडगोळी नेथन लायन आणि स्टिव्हन ओकिफ यांनी मिळून १७ बळी मिळवत भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले. त्यामुळे भारताने तो सामना तब्बल २०३ धावांनी गमावला. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याची खेळपट्टी फिरकीपटूंना फार मदत करेल याची शक्यता कमी आहे. मात्र, ही खेळपट्टीसुद्धा फिरकीपटूंना अनुकूल असल्यास अश्विन आणि रविंद्र जाडेजाविरुद्ध धावा करणे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अवघड जाईल.

दुसरीकडे पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गर आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या डावात शतके करत भारतीय गोलंदाजांना झुंज दिली. मात्र, त्यांना कर्णधार फॅफ डू प्लेसिस वगळता इतरांची साथ लाभली नाही. भारताचे फिरकीपटू विकेट्स मिळवत असताना दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराज, डेन पीड आणि सेनूरन मुथुस्वामी यांना मात्र फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे पीड किंवा सेनूरन यांच्यापैकी एकाला वगळून फलंदाज झुबैर हमजा किंवा वेगवान गोलंदाज लुंगी इंगिडीला संधी मिळू शकेल. परंतु, त्यांच्या समावेशनानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भारताला रोखण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल हे निश्चित.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, रिषभ पंत, कुलदीप यादव, शुभमन गिल, उमेश यादव.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), टेंबा बवूमा, थानीस डी ब्रून, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डीन एल्गर, झुबैर हमजा, केशव महाराज, एडन मार्करम, सेनूरन मुथुसामी, लुंगी इंगिडी, एन्रिच नॉर्टजे, व्हर्नोन फिलँडर, डेन पीड, कागिसो रबाडा, हेन्रिक क्लासन.

सामन्याची वेळ – सकाळी ९.३० पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क