तिसर्‍या वनडेत पंतवर लक्ष!

भारत-विंडीज अखेरचा सामना आज

Mumbai
पंत

वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसर्‍या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने विजय मिळवला. त्यामुळे भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेत, आपण ही मालिका गमावणार नाहीत हे निश्चित केले. विंडीजला मात्र या मालिकेत बरोबरी करण्यासाठी बुधवारी होणारा तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना जिंकणे अनिवार्य झाले आहे. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी या दौर्‍यात खेळला नाही. त्यामुळे युवा रिषभ पंतला दोन्ही एकदिवसीय आणि त्याआधी झालेले तीनही टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र, टी-२० मालिकेतील अखेरचा सामना वगळता त्याला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे तो तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे सार्‍यांचे लक्ष असेल.

दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना कर्णधार कोहलीला मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने ७१ धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. तो या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा पंत खराब फटका मारून अवघ्या २० धावांवर बाद झाला. त्यामुळे दीर्घ काळासाठी संयमाने फलंदाजी करण्याच्या पंतच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच चौथ्या क्रमांकासाठी पंतपेक्षा श्रेयस योग्य पर्याय आहे, असे मत भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. त्यामुळे पंतवर अखेरच्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा दबाव आहे. युवा अय्यर या सामन्यातही दमदार प्रदर्शन करत भारतीय संघात आपले स्थान पक्के करण्यासाठी उत्सुक असेल. भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना या दौर्‍यात मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. खासकरून धवनची कसोटी मालिकेसाठी निवड न झाल्यामुळे तो अखेरच्या एकदिवसीय सामन्यात चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल.

गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात ४ विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला मोहम्मद शमी (२/३९) आणि चायनामन कुलदीप यादव (२/५९) यांनी चांगली साथ दिली. कुलदीपने विकेट्स मिळवल्या असल्या तरी त्यासाठी त्याला बर्‍याच धावा मोजाव्या लागल्या. त्यामुळे या कामगिरीत सुधारणा करण्याचे त्याचे लक्ष्य असेल. टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी करणार्‍या नवदीप सैनीला तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात पदार्पणाची संधी मिळू शकेल.

विंडीज फलंदाजांना खेळात सुधारणा गरजेची
विंडीजच्या गोलंदाजांनी टी-२० मालिका आणि दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात उत्तम कामगिरी केली, पण त्यांना फलंदाजांची साथ लाभलेली नाही. आता ही एकदिवसीय मालिका गमवायची नसल्यास विंडीजच्या फलंदाजांना त्यांचा खेळ उंचवावा लागणार आहे. अनुभवी क्रिस गेलने दुसर्‍या सामन्यात दोन विक्रम केले. मात्र, त्याला या मालिकेच्या २ सामन्यांत मिळून केवळ १५ धावा करता आल्या आहेत. तिसर्‍या सामन्यात त्याच्या जागी जॉन कॅम्पबलला संधी मिळू शकेल.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी, लोकेश राहुल, मनीष पांडे, युजवेंद्र चहल.

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रिस गेल, जॉन कॅम्पबल, इव्हन लुईस, शाई होप, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, रॉस्टन चेस, फॅबियन अ‍ॅलन, कार्लोस ब्रेथवेट, किमो पॉल, शेल्डन कॉटरेल, ओशेन थॉमस, किमार रोच

सामन्याची वेळ – रात्री ७ पासून
थेट प्रक्षेपण – सोनी स्पोर्ट्स नेटवर्क