घरक्रीडाधवनच्या जागी मयांकची वर्णी!

धवनच्या जागी मयांकची वर्णी!

Subscribe

भारत-विंडीज एकदिवसीय मालिका

भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे टी-२० मालिकेपाठोपाठ वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी सलामीवीर मयांक अगरवालची भारतीय संघात निवड झाली आहे. मयांकने मागील काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच तो आक्रमक शैलीत फलंदाजी करत असल्याने एकदिवसीय संघासाठी त्याचा खूप दिवसांपासून विचार केला जात होता. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान अष्टपैलू विजय शंकरला दुखापत झाल्यानंतर मयांकची भारताच्या संघात निवड झाली होती. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या सुपर लीगमधील महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात दिल्लीकडून खेळणार्‍या धवनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला विंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकावे लागले. मात्र, तो एकदिवसीय मालिकेआधी फिट होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी अजून काही काळ लागणार आहे.

- Advertisement -

धवनला पूर्णपणे फिट होण्यासाठी अजून काही काळ लागणार आहे. त्यामुळे अखिल भारतीय सिनियर निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी त्याच्या जागी मयांक अगरवालची भारतीय संघात निवड केली आहे, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना चेन्नई (१५ डिसेंबर), दुसरा सामना विशाखापट्टणम (१८ डिसेंबर) आणि तिसरा सामना कटक (२२ डिसेंबर) येथे होणार आहे. मयांक सध्या रणजी करंडकात कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करत असून तो चेन्नई येथे होणार्‍या पहिल्या सामन्याआधी भारतीय संघाशी जोडला जाईल. या संघात फॉर्मात असलेला लोकेश राहुल आणि अनुभवी रोहित शर्मा असल्याने मयांकला पदार्पणाच्या संधीसाठी वाट पाहावी लागू शकेल.

- Advertisement -

विंडीज एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -