इंडोनेशिया मास्टर्स : सायना, श्रीकांत पहिल्याच फेरीत गारद

Mumbai
saina nehwal and Srikanth Kidambi
सायना, श्रीकांत

गतविजेत्या सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुषांमध्ये किदाम्बी श्रीकांत आणि जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या साई प्रणितवरही स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढवली. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी या भारतीय जोडीचेही आव्हान संपुष्टात आले. पहिल्या फेरीत त्यांना को सुंग ह्युन आणि इओम हे वॉन दक्षिण कोरियन जोडीने ८-२१, १४-२१ असे सरळ गेममध्ये पराभूत केले.

मागील वर्षी इंडोनेशिया मास्टर्स जिंकणार्‍या सायनाला यंदा मात्र चांगला खेळ करण्यात अपयश आले. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत जपानच्या सयाका ताकाहाशीने सायनावर १९-२१, २१-१३, २१-५ अशी मात केली. या सामन्याचा चुरशीचा झालेला पहिला गेम सायनाने २१-१९ असा जिंकला. मात्र, दुसर्‍या आणि तिसर्‍या गेममध्ये तिचा खेळ खालावला. तिसर्‍या गेममध्ये तर केवळ ५ गुण मिळवता. त्यामुळे तिला पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर व्हावे लागले.

पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानी असणार्‍या किदाम्बी श्रीकांतला शेसर हिरेन ऋस्टविटोने २१-१८, १२-२१, १४-२१ असे, तर प्रणितला आठव्या सीडेड चीनच्या शी यु क्वीने २१-१६, १८-२१, १०-२१ असे पराभूत केले. सौरभ वर्मालाही पराभवाचा सामना करावा लागला. त्याने चीनच्या लू गुआंग झूविरुद्धचा सामना २१-१७, १५-२१, १०-२१ असा गमावला.

सिंधूची विजयी सलामी

विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. पाचव्या सीडेड सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत जपानच्या अया ओहोरीवर १४-२१, २१-१५, २१-११ असा विजय मिळवला. तिचा दुसर्‍या फेरीत सायना नेहवालवर मात करणार्‍या जपानच्या सयाका ताकाहाशीसोबत सामना होईल. सिंधू आणि ताकाहाशी यांच्यात आतापर्यंत ६ सामने झाले आहेत, ज्यापैकी ४ सामने सिंधूने जिंकले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here