KXIP vs RCB: राहुल-गेलचं वादळ; पंजाबची पराभवाची मालिका खंडित

किंग्ज इलेव्हन पंजाबने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ८ गडी राखून पराभूत केलं. या विजयाने पंजाबने पराभवाची मालिका खंडित केली आहे. बँगलोरच्या १७२ धावांचं आव्हान पंजाबने सहज पार केलं. मयांक अगरवाल, ख्रिस गेल आणि लोकेश राहुलच्या फलंदाजीच्या जोरावर बँगलोरला हरवलं.

बँगलोरच्या १७२ धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर मयांक अगरवाल आणि कर्णधार राहुल या दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचली. चहलने मयांक अगरवालला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. अगरवालने २५ चेंडूत ४५ धावा केल्या. यामध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. अगरवाल बाद झाल्यानंतर यंदाच्या मोसमातील पहिला सामना खेळणाऱ्या ख्रिस गेलने सुंदर फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं. २ चेंडूत एका धावेची गरज असताना ख्रिस गेल चोरटी धाव घेताना धावचित झाला. गेलने ४५ चेंडूत ५३ धावा केल्या. यामध्ये ५ षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. शेवटच्या चेंडूत १ धावेची गरज असताना निकोलस पूरनने षटकार खेचत संघाला विजयी केलं. या सामन्यात पुन्हा एकदा पंजाबचा कर्णधार केएल राहुल नाबाद राहिला. राहूलने ४९ चेंडूत ६१ धावा केल्या. या खेळीत ५ षटकार आणि १ चौकाराचा समावेश आहे. पंजाबने हा सामना ८ गडी राखून जिंकत पराभवाची मालिका खंडित केली. बँगलोरकडून केवळ चहलने १ गडी बाद केला. बँगलोरच्या इतर गोलंदाजांनी या सामन्यात पार निराशा केली. मयांक अगरवाल, राहुल आणि गेल बँगलोरच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हावी होम बसले होते. त्यामुळे या सामन्यात त्यांचा विजय सुकर झाला.

शारजावर झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून RCB चा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आश्वासक सुरुवातीनंतर RCB चे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले, ज्यामुळे शारजाच्या मैदानावर यंदा चाहत्यांना चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहता आली नाही. देवदत पडीकल आणि फिंच या सलामीच्या जोडीने RCB च्या संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. दोन्ही फलंदाजांमध्ये ३८ धावांची भागीदारी झाल्यानंतर अर्शदीप सिंहने देवदत पडीकलला माघारी धाडलं. त्याने १८ धावा केल्या. यानंतर फिंच आणि कर्णधार कोहली यांच्यातही छोटेखानी भागीदारी झाली. परंतू मुरगन आश्विनने फिंचचा त्रिफळा उडवत RCB ला दुसरा धक्का दिला. आजच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर RCB ने वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली. एकीकडे विराट कोहली संघाची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असताना वॉशिंग्टन सुंदरही आश्विनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर डिव्हीलियर्स मैदानात येईल असं वाटत असताना शिवम दुबे मैदानात आला. दुबे आणि कोहलीने संघाचा डाव सावरत, RCB ला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. शिवम दुबे बाद झाल्यानंतर डिव्हीलियर्स मैदानात आला. शारजाच्या मैदानावर एबी डिव्हीलियर्सची फटकेबाजी पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची यावेळी मात्र निराशा झाली. या सामन्यात डिव्हीलियर्सला साजेशी खेळी करता आली नाही. डिव्हीलियर्सने केवळ २ धावा केल्या. पंजाबच्या गोलंदाजांनीही टिच्चून मारा करत RCB च्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. फटकेबाजी करुन धावा जमवण्याच्या गडबडीत विराट कोहलीही शमीच्या जाळ्यात अडकल्या. स्लो बाऊन्सरवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराट यष्टीरक्षक लोकेश राहुलकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने ३९ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात ख्रिस मॉरिसने फटकेबाजी करत RCB ला १७१ धावांचा पल्ला गाठून दिला.पंजाबकडून मोहम्मद शमी आणि मुरगन आश्विनने प्रत्येकी २ तर अर्शदीप सिंह आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी १-१ बळी घेतला.