टी-२० वर्ल्डकप पुढे गेल्यास आयपीएल

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकेल!,बीसीसीआय अधिकार्‍याचे विधान

Mumbai
icc t20 world cup

करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सर्वच स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धाही याला अपवाद नाही. या स्पर्धेच्या तेराव्या पर्वाला २९ मार्चपासून सुरुवात होणार होती. परंतु, करोनाच्या धोक्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. करोना प्रादुर्भाव अजूनही कमी होत नसल्याने ही स्पर्धा इतक्यात होण्याची शक्यता कमीच आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक लांबणीवर गेल्यास आयपीएल स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकेल असे बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याला वाटते.

सध्या सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. जवळपास सर्वच देशांनी आपल्या सीमा बंद केल्यास असून ऑस्ट्रेलियाने सहा महिन्यांसाठी लॉकडाऊन केले आहे. परिस्थितीत सुधारणा झाली तर यात बदल होऊ शकेल. परंतु, करोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास इंग्लंडही अशीच पावले उचलण्याची शक्यता आहे. भारतीय प्रशासन आपल्या सीमांबाबत काय करणार हे अजून आम्हाला कळलेले नाही. त्यामुळे सध्यातरी आयपीएल स्पर्धेसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरचा काळ सर्वात सुरक्षित वाटतो.

परंतु, याच काळात टी-२० विश्वचषक होणार आहे. आयसीसीने जर हा विश्वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, तरच आम्ही आयपीएल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्याबाबत विचार करु शकतो. सर्वच देशांत सहा महिन्यांसाठी लॉकडाऊन करण्यात आले, तरीही ते ऑक्टोबरमध्ये संपण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत करोनाचा प्रादुर्भाव थांबणे किंवा त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे, असे बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.

तसेच बीसीसीआयच्या अधिकार्‍याने पुढे सांगितले, आयसीसीने टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना ही स्पर्धा थेट २०२२ मध्ये घ्यावी लागेल. २०२१ मध्ये ही स्पर्धा घेणे शक्य नाही. सध्यातरी काहीही सांगणे अवघड आहे. मात्र, आयपीएल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्याबाबत आम्ही नक्कीच चर्चा केली आहे, पण ही स्पर्धा होण्यासाठी बर्‍याच गोष्टी जुळून याव्या लागतील.

वर्ल्डकप अजूनतरी ठरल्याप्रमाणेच होणार!

ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार आहे. अजूनतरी ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार नसल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्याबाबत आम्ही अजूनतरी चर्चा केलेली नाही, असे अधिकारी म्हणाला. टी-२० विश्वचषक ठरल्याप्रमाणे होईल अशी ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष केविन रॉबर्ट्स यांना आशा आहे.